गुन्हेगाराच्या पत्नीसोबत फिरणाऱ्यास मारहाण

गुन्हेगाराच्या पत्नीसोबत फिरणाऱ्यास मारहाण

पिंपरी (रफिक शेख) : सराईत गुन्हेगाराच्या पत्नीसोबत फिरतो म्हणून तरुणाला शिवीगाळ केली. तसेच तुरुंगातून सुटून आलेल्या गुन्हेगाराने मारहाण केली. गावजत्रा मैदान, भोसरी येथे बुधवारी (दि. १८) दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली. अमित बाळासाहेब भालेराव (वय ३४, रा. दिघी रोड, भोसरी) यांनी या प्रकरणी शुक्रवारी (दि. २०) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. रुपेश पाटील आणि त्याच्याबरोबरचे इसम यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या फिर्यादी यांची लहानपणापासून ओळख असलेला ३१ वर्षीय तरुण सराईत गुन्हेगार आहे. त्याच्या २१ वर्षीय पत्नीला फिर्यादी हे बहीण मानतात.

फिर्यादीची ओळख असलेल्या गुन्हेगाराला सुमारे साडेतीन वर्षांपूर्वी भोसरी पोलीस ठाण्यातील मोक्काच्या केसमध्ये अटक करण्यात आली. तेव्हापासून तो जेलमध्ये आहे. तसेच आरोपी रुपेश पाटील याला काही महिन्यांपूर्वी पोलिसांनी काही प्रकरणांमध्ये अटक केली होती. आठवडाभरापूर्वी तो येरवडा जेलमधून सुटला. दरम्यान, फिर्यादी हे बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी बुधवारी (दि. १८) दुपारी चारच्या सुमारास भोसरी येथील गावजत्रा मैदान येथे गेले. त्यावेळी आरोपी रुपेश पाटील आणि त्याच्याबरोबरचे इसम तेथे आले. तु तुझ्या ओळखीच्या गुन्हेगाराच्या पत्नीसोबत फिरतो म्हणून तुला मारायला सांगितले आहे. असे म्हणून आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ केली. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करून तेथे पडलेले दगड फेकून मारले. यात फिर्यादीला मुका मार लागला, असे फिर्यादीत नमूद आहे.

About The Author

error: Content is protected !!