राज्य सरकारने इंधनावरील कर आणखी कमी करावा – बाळासाहेब पाटोदे
उदगीर (प्रतिनिधी) : जागतिक स्तरावर कच्च्या तेलाचे भाव गगनाला भिडले आहेत, हे सर्वजण जाणतात. असे असताना सुद्धा देशातील जनतेचा विचार करून ,जनतेला महागाईपासून दिलासा देण्यासाठी केंद्र शासनाने केंद्रीय उत्पादन शुल्क मधून पेट्रोल वर आठ रुपये आणि डिझेलवर सहा रुपये कर जनतेसाठी कमी केला आहे. यामुळे केंद्र सरकारने लोक हिताचा विचार करून जवळपास दोन लाख कोटी पेक्षा जास्तीचा भार सहन करायचा निर्णय घेतला आहे. केवळ जनतेचे हित लक्षात घेता केंद्र सरकारने हे आक्रमक पाऊल उचलले आहे. आजच्या घटकेला केंद्र सरकारचा कर हा 19 रुपये आहे, तर राज्य सरकारचा कर तीस रुपये आहे.
महाराष्ट्र राज्य संपूर्ण देशामध्ये पेट्रोल व डिझेल वर सर्वात जास्त कर आकारणारे राज्य असून जनतेच्या हितासाठी व महागाई कमी करण्यासाठी तात्काळ हे इंधनावरील कर कमी करण्यात यावेत. अशी मागणी उदगीर तालुका भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटोदे यांनी केली आहे .
भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीचे निवेदन उपजिल्हा अधिकारी यांच्यामार्फत महाराष्ट्र शासनाला पाठवले आहे. सदरील निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की, संपूर्ण देशातील इतर राज्य इंधनावर केवळ 17 ते 18 रुपये कर आकरत असताना, महाराष्ट्र सरकार मधील महा विकास आघाडीने तब्बल जवळपास तीस रुपये इतक्या मोठ्या प्रमाणात कर आकारणी सुरू करून जनतेला महागाईच्या खाईत ढकलून दिले आहे. हा घोर अन्याय तात्काळ थांबला पाहिजे, अशीही मागणी करण्यात आली आहे. भारतीय जनता युवा मोर्चा द्वारे सरकारला मागणी करण्यात येते की, राज्य सरकारने आणखी कर कमी करावा. जेणेकरून महागाईला आळा बसेल, आणि जनतेला दिलासा मिळेल. जर राज्य सरकारने योग्य पाऊल उचलले नाही तर, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टी आंदोलन करेल असा इशाराही देण्यात आला आहे. निवेदनावर भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटोदे, भाजपचे शहराध्यक्ष मनोज पुदाले, भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष लक्ष्मीकांत पाटील ,भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अमोल निडवदे, यांच्यासह नवज्योत शिंदे, संदीप कुलकर्णी, संतोष भालेराव, नमनगे परमेश्वर, संदीप पिंपरे ,रामेश्वर पटवारी, राजेंद्र महाजन ,ऋषिकेश पाटील, संतोष पाटील, संगमेश्वर समगे, भुईंनर गणेश, सुभाषराव किटेकर, साईनाथ सदानंदे, पृथ्वीराज राचोट्टे, मंगेश येरकुंडे ,कृष्णा बिरादार, भरत कुंडगीर, महादेव शेंडगे ,अक्षय घोरपडे, राजेश्वर इत्यादींच्या स्वाक्षर्या आहेत.
महाराष्ट्र शासनाने महागाईला आळा घालण्यासाठी किरकोळ कर कमी केल्याचे सांगितले जात असून ही जनतेची दिशाभूल आहे. त्यामुळे ही दिशाभूल दूर करून तात्काळ आणखी कर कमी करावा. अशीही मागणी बाळासाहेब पातोदे यांनी केली आहे.तीन दिवसात कारवाई पूर्ण करावी आण्यथा युवा मोर्चा कठोर आंदोलन करेल,असाही इशारा देण्यात आला आहे.