अमृत पाणी पुरवठा योजनेची शिल्लक कामे,15 दिवसांत पुर्ण करण्याचे निर्देश – राज्यमंत्री संजय बनसोडे
उदगीर (एल. पी. उगीले) : उदगीर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या अमृत योजनेचे कामे सुरू आहेत. शहराला नियमित व सुरळीत पाणी पुरवठा करण्यासाठी ही योजना त्वरित पुर्ण करण्याचे निर्देश राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिले आहेत.
उदगीर शहराच्या पाणीपुरवठा संदर्भात लातूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्हाधिकारी बी.पी. पृथ्वीराज, नगरपालिका प्रशासकीय अधिकारी सतिश शिवणे, महाराष्ट्र जीवनप्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता श्री.कायंदे, उदगीर नगरपालिका मुख्याधिकारी शुभम क्यातमवार तसेच या योजनेचे काम करणारे कंत्राटदार व अधिकारी उपस्थित होते.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या अमृत योजनेचे उर्वरित काम 15 दिवसांत पुर्ण करण्यात यावेत. या सोबतच या योजनेसाठी शहरातील रस्ते खोदण्यात आले आहेत, ती मजुरांची संख्या वाढवून युध्द पातळीवर पावसाळ्याच्या आत करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. या सोबत या योजनेअंतर्गत ज्या भागात नळजोडणी झाली नाही, अशा वाढीव भागातील नळ जोडणीसाठी चार टिम तयार करुन प्रतिदिन कमीत -कमी 200 नळ जोडणीचे लक्ष निर्धारीत करण्यात यावे, या सोबतच शहरात 07 झोनमार्फत पाणीपुरवठा करण्यात येतो. या सातही झोनला नियमीत व सुरळीत पाणी पुरवठा करण्याच्या सुचना महाराष्ट्र प्राधिकरणाला देण्यात आल्या असुन येणाऱ्या 15 दिवसांत ही योजनेचे पुर्ण क्षमतेने कार्यान्वित करावी. तसेच शहरातील काही भागात नियमित पाणी पुरवठा करण्यात येत नाही अशा भागातील तांत्रिक अडचण दुरूस्त करावी. या योजनेसाठी लागणाऱ्या सौरऊर्जा प्रकल्पाच्या अडचणी त्वरित दुर करण्याचे निर्देश पाणी पुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिले आहेत.