हिंदी ही जागतिक व्यवहाराची भाषा बनली आहे – डॉ. विवेक मणि त्रिपाठी

हिंदी ही जागतिक व्यवहाराची भाषा बनली आहे - डॉ. विवेक मणि त्रिपाठी

अहमदपूर (गोविंद काळे) : जनभाषा, राजभाषा, संपर्कभाषा ते सांस्कृतिक वारसा लाभलेली भाषा हा हिंदीचा ऊर्ध्वगामी प्रवास अत्यंत लाभदायक महत्त्वाचा असून, आता ती जागतिक व्यवहाराची भाषा बनली आहे, असे प्रतिपादन चीन येथील हिंदी भाषेचे अभ्यासक, संशोधक, प्राध्यापक डॉ. विवेक मणि त्रिपाठी यांनी केले. येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या हिंदी विभागातर्फे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एक दिवसीय आंतरराष्ट्रीय आभासी चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे आणि बीज भाषक म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे होते. यावेळी किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीरंगराव पाटील एकंबेकर, सचिव ज्ञानदेव झोडगे गुरुजी यांची विशेष उपस्थिती होती.’ वैश्विक परिप्रेक्ष्य में हिंदी भाषा और साहित्य ‘ या विषयावर झालेल्या आभासी चर्चासत्रात प्रमुख वक्ते म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या हिंदी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. रावसाहेब जाधव,नवी दिल्ली येथील रामानुजन महाविद्यालयाचे हिंदी विभागप्रमुख डॉ. अलोक रंजन पांडे हे उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत ‘वैश्वीकरण के परिप्रेक्ष मे हिंदी भाषा और साहित्य ‘ या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले

यावेळी पुढे बोलताना डॉ. विवेक मणि त्रिपाठी म्हणाले की, भारतात सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाची असलेली हिंदी भाषा जागतिकीकरणाच्या काळात जगाला जोडणारी महत्त्वाची संपर्क भाषा बनली आहे. चीन मध्ये हिंदी महत्वाची भाषा म्हणून अभ्यासली जाते. हिंदीच्या अभ्यासासाठी खासकरून चीनमधून अनेक अभ्यासक भारतात आलेले होते. आजही चीन मध्ये हिंदी भाषेला खूप महत्त्व असून, चीन मधील १७ विद्यापीठात हिंदी भाषा शिकवली जाते, असेही ते म्हणाले.
उद्घाटन सत्रानंतर झालेल्या शोधनिबंध वाचन सत्राचे अध्यक्षस्थान स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या हिंदी अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. रमेश कुरे यांनी भूषविले. यावेळी डॉ. शिवहार साळुंखे, डॉ. आशा राठौर, डॉ. बी.बी. राठोड आदींनी शोधनिबंध सादर केले. या सत्राचा अध्यक्षीय समारोप डॉ. रमेश कुरे यांनी केला. तर चर्चासत्राचा अध्यक्षीय समारोप करतांना कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील म्हणाले की, हिंदी ही जागतिकीकरणातील सर्वात महत्त्वाची भाषा बनली असून, हिंदीच्या विशेष अभ्यासाची गरज लक्षात घेता विद्यार्थ्यांनी आणि संशोधकांनी या भाषेचा खासकरून व्यावहारिकदृष्ट्या कसा उपयोग होईल यादृष्टीने अभ्यास केला पाहिजे. या अंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे प्रास्ताविक संयोजक डॉ. नागराज मुळे यांनी केले तर सूत्रसंचालन सहसंयोजक डॉ. पांडुरंग चिलगर यांनी केले व आभार प्रदर्शन डॉ. संतोष कुलकर्णी यांनी केले. देशातील तसेच परदेशातील विविध अभ्यासक या आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात सहभागी झाले होते.

About The Author

error: Content is protected !!