पोलिसांशी झटापट पडली महागात
पिंपरी (प्रकाश इगवे) : द्रुतगती मार्गावरून ट्रिपलसीट जाणाऱ्या दुचाकीस्वाराला अडविले असता त्याने पोलिसांच्या अंगावर दुचाकी घातली. तसेच त्यांच्याशी अरेरावी करून झटापट केली. सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी पोलिसांनी दुचाकीस्वाराला अटक केली. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर उर्से टोलनाका येथे शुक्रवारी (दि. २७) दुपारी पावणेएकच्या सुमारास ही घटना घडली. नरेश हरिभाऊ भरणे (वय ४०, रा. येलघोल, ता. मावळ) असे अटक केलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. पोलीस उपनिरीक्षक राजू लुमाजी भालचिम (वय ५५) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली.