परोपकार आणि लोक कल्याण हेच अहिल्यादेवी होळकर यांचे धोरण होते – डॉ. विनोदकुमार विश्वकर्मा विमल

परोपकार आणि लोक कल्याण हेच अहिल्यादेवी होळकर यांचे धोरण होते - डॉ. विनोदकुमार विश्वकर्मा विमल

अहमदपूर (गोविंद काळे) : पती, पुत्र आणि कर्तृत्वान सासऱ्यांचे निधन झाल्यानंतर खचून न जाता तत्कालीन रुढी परंपरांना झुगारून देत स्वतःच्या हाती राज्यकारभार घेऊन राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या प्रचंड आत्मविश्वासाच्या, नीतिमत्तेच्या आणि शौर्याच्या बळावर ३८ वर्ष राज्य केले. परोपकार आणि लोककल्याण हेच त्यांच्या राजकारणाचे धोरण होते. असे, प्रतिपादन त्रिभुवन विश्वविद्यालय, कीर्तीपूर नेपाळ येथील ज्येष्ठ अभ्यासक प्रो.डॉ. विनोदकुमार विश्वकर्मा ‘विमल’ यांनी केले. येथील महात्मा फुले महाविद्यालयात हिंदी विभागाच्या वतीने स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९७ व्या जयंतीनिमित्त ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होलकर जीवन और कार्य ‘ या विषयावर एक दिवशीय आंतरविद्याशाखीय आंतर्राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे होते. यावेळी किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीरंगराव पाटील एकंबेकर, सचिव ज्ञानदेव झोडगे गुरुजी यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना डॉ. विश्वकर्मा म्हणाले की, अहिल्यादेवी या प्रत्यक्ष रणांगणावर लढणाऱ्या महान विरांगणा होत्या. त्याच बरोबर जनतेबद्दल त्यांच्या मनात अपार कळवळा होता. आपल्या जनतेवर त्यांनी लेकरासारखे प्रेम केले. मायेची, ममतेची आणि कारुण्याची सोनेरी झालर त्यांच्या वैभवशाली व्यक्तिमतत्त्वाला होती त्याचबरोबर हिंदू धर्माच्या मंदिरांचे जीर्णोद्धार करण्याचे कार्यही अहिल्यादेवींनी केले त्या शिवभक्त होत्या असेही ते म्हणाले.
यावेळी बीजभाषक म्हणून प्रो. डॉ. पंडित बन्ने, सोलापूर, प्रमुख मार्गदर्शक डॉ.बाळासाहेब कामन्ना, पट्टणकडोली यांनीही मार्गदर्शन केले. या चर्चासत्राच्या शोधनिबंध वाचनसत्राचे अध्यक्षस्थान प्रो. डॉ. मुरलीधर लहाडे, बनसारोळा यांनी भूषविले. सत्रात डॉ.सुमा टी. रोडनवार (कर्नाटक), डॉ.नुपूर देशावर, जबलपूर (मध्यप्रदेश ) डॉ. अमर आलदे, चौसाळा, महाराष्ट्र या संशोधकांनी प्रातिनिधिक स्वरूपात अभ्यासपूर्ण शोधनिबंध सादर केले.
अध्यक्षीय समारोपात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील म्हणाले की, त्यांच्या राज्यात जनता सुखी, समाधानी होती. त्यांनी अध्यात्माबरोबरच लोक कल्याणाचे ही कार्य केले. समाजाला प्रगतीची दिशा दाखविली, असेही ते म्हणाले. यावेळी “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होलकर: जीवन और कार्य” या ग्रंथाचे प्रकाशनही मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इतिहास विभाग प्रमुख डॉ. बब्रुवान मोरे यांनी केले. प्रास्ताविक चर्चासत्राचे संयोजक डॉ. पांडुरंग चिलगर यांनी केले , तर आभार प्रदर्शन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी यांनी केले.या आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय आभासी चर्चासत्राला देश-विदेशातून अनेक संशोधक अभ्यासक विद्यार्थी उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!