शहराच्या सर्वांगीण विकासासाठी वचनबद्ध – राजेश्वर निटुरे
उदगीर (एल. पी. उगिले) : उदगीर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण वचनबद्ध आहोत. नागरी सुविधा पुरविण्यासाठी आणि नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आजपर्यंत आपण कसोशीने प्रयत्न केले आहेत. सत्ता असो अगर नसो सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. असे उद्गार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे यांनी व्यक्त केले. ते उदगीर येथील फुले नगर भागात विविध विकास कामाच्या उद्घाटन सोहळ्याच्या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
याप्रसंगी उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा मलकापूर ग्रामपंचायतीचे उपसरपंच सिद्धेश्वर उर्फ मुन्ना पाटील, बाजार समितीचे उपसभापती रामराव बिरादार येनकीकर, रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष देविदास कांबळे, राष्ट्रीय काँग्रेसचे युवा जिल्हाध्यक्ष विजय राजेश्वर निटुरे, माजी नगरसेवक वेंकट बोईनवाड, दिलीप सोनकांबळे, अमोल घुमाडे, नागेश पटवारी, गायकवाड झटिंग,रामचंद्र, कांबळे, बाबुराव कांबळे, मुरलीधर सोनकांबळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन काँग्रेसचे युवा नेते शशिकांत बनसोडे यांनी केले होते.
पुढे बोलताना राजेश्वर निटूरे म्हणाले की, भारतीय जनता पक्षाच्या काळात कोणतेही विकासाची कामे झाली नाहीत. केवळ विकासाच्या गप्पा मारणे आणि दुसऱ्याच्या कामाचे श्रेय घेणे, याच्या पलीकडे काहीच झाले नाही. विकास काय असतो? हे आम्ही दाखवून दिले आहे. यापुढेही उदगीर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण वचनबद्ध आहोत. अशी ग्वाही राजेश्वर निटूरे यांनी याप्रसंगी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागेश पटवारी यांनी तर आभार प्रदर्शन शशिकांत बनसोडे यांनी केले.
