13 लाख 50 हजार रुपयांचा ऐवज चोरीला, गुन्हा दाखल
उदगीर (एल.पी. उगिले) : उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील अंबिका कॉलनी सोमनाथपूर तालुका उदगीर येथील फिर्यादी अभिषेक प्रकाश वारद यांनी उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे रितसर फिर्याद दिली की, ते घरी झोपले असताना अज्ञात चोरट्यांनी फिर्यादीच्या घराचे स्लाइडिंग चे लोखंडी गेटचे कुलूप, कोंडा तोडून घरामध्ये प्रवेश केला. फिर्यादीचे भावाच्या बेडरूममधील लोखंडी कपाटातील सोन्याच्या दागिन्यांचा एकूण ऐवज अंदाजे तेरा लाख पन्नास हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. वगैरे फिर्यादी जबाब पोलीस स्टेशन येथे येऊन दिल्यावरून पोलीस निरीक्षकांच्या आदेशाने गुन्हा नोंद करून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चेरले यांच्याकडे देण्यात आला आहे.
याप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 260/ 22 कलम 457, 380 भारतीय दंड विधान संहिता अन्वये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरील घटना दिनांक 6 जून रोजी रात्री साडेअकरा ते दिनांक सात जून रोजी पहाटे साडेचार वाजण्याच्या दरम्यान घडली आहे.
याप्रकरणी दहा तोळे सोन्याच्या पाटल्या व बांगड्या किंमत अंदाजे चार लाख पन्नास हजार , साडेसहा तोळ्याचे सोन्याचे गंठण किंमत अंदाजे दोन लाख 92 हजार पाचशे रुपये, साडेतीन तोळ्याचे सोन्याचे एक लॉकेट किंमत अंदाजे 1 लाख 57 हजार पाचशे रुपये ,तीन तोळ्याचा राणीहार किंमत अंदाजे 1 लाख 35 हजार रुपये ,तीन तोळे सोन्याचे कानातले टॉप, सेकंड टॉप, सरकाळे किंमत अंदाजे 1 लाख 35 हजार रुपये ,सोन्याच्या अंगठ्या व मंगळसूत्र किंमत अंदाजे एक लाख 80 हजार रुपये असा एकूण 13 लाख 50 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने यांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरला आहे. सदरील चोरीबद्दल परिसरामध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे .
उदगीर शहराच्या परिसरातील भाग या ठिकाणी ग्रामीण पोलीस स्टेशन च्या वतीने गस्त वाढवणे गरजेचे आहे. असे नागरिकांचे मत आहे . नवीन वसाहती वाढत चालल्याने पोलिसांनी या भागामध्ये गस्त घालून चोरीचे प्रमाण कमी करावे, अशी मागणी होत आहे . मात्र नागरिकांच्या मागणीला केराची टोपली दिली जात असल्याने नागरिक तक्रारही करणे सोडून देत आहेत. वास्तविक पाहता पोलीस आपले मुख्य काम सोडून इतर कामाकडे जास्त लक्ष देत असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात चालू आहे.
यासंदर्भात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे .तसेच घरफोड्या आणि चोऱ्या यांना कसा प्रतिबंध घालता येईल? यासंदर्भात गांभीर्याने विचार करून सदरील तपास स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेकडे सुपूर्द करावा. अशीही मागणी केली जात आहे.
