प्रभूच्या नामस्मरणातच जीवनाची सार्थकता – ह.भ.प. तेलगाणे महाराज

प्रभूच्या नामस्मरणातच जीवनाची सार्थकता - ह.भ.प. तेलगाणे महाराज

उदगीर (प्रतिनिधी) : मानवी जीवनाची सार्थकता फक्त आणि फक्त परमेश्वराच्या भक्तीमध्ये आणि नामस्मरणामध्येच आहे. असे प्रतिपादन ह भ प शरदकुमार तेलगाने महाराज यांनी केले.त्यांनी एकादशी निमित्त समतानगर भागातील हरिकीर्तन सेवा करताना प्रतिपादन केले. आपल्या कीर्तनातून समाजप्रबोधनाचे विविध विषय त्यांनी हाताळले, अध्यात्म सोबतच मानवी जीवनातील आरोग्य, सामाजिक जाणिवा, अंधश्रद्धा निर्मूलन या विषयाला ही त्यांनी हात घातला. आणि सर्वसामान्य माणसाला आनंदाने जगायचे असेल तर परमेश्वराचे नामस्मरण करणे आणि आपल्या मनाची आघात शक्ती आहे ती शक्ती प्रत्यक्षात उपयोगात आणायचे असेल तर मनाच्या कप्प्यात परमेश्वराला ठेवा म्हणजे जीवनाचे सार्थक होईल.असे सांगितले.
कित्येक जन जीवन जगत असताना अस्वस्थ असतात, मानसिक स्थिरता त्यांना प्राप्त होत नाही. परिणामी त्यांच्या कुटुंबामध्ये कलह वाढत जातो. कुटुंबामध्ये सुखी-समाधानी राहयचे असेल तर आपल्या कुटुंबातील एक तरी व्यक्ती वारकरी सांप्रदायाला समर्पित करावा. जेणेकरून संपूर्ण कुटुंबाच्या बाबतीत अध्यात्मिक शक्ती वाढेल.
आपले मन जर चित्रपट सृष्टीत रमत असेल तर आपले शरीर चित्रपटगृह होईल, जर आपण क्रिकेटसारख्या खेळामध्ये रममान होत असू तर आपले शरीर खेळाचे क्रीडांगण होईल. परमेश्वराने मनुष्यदेह देताना जीवनाचे सार्थक करण्यासाठी दिलेला आहे. त्याला बुद्धी दिलेली आहे. त्या बुद्धीला सत्य मार्गाला घेऊन जाणे हे त्याचे कर्तव्य आहे, कारण मनात जे असेल तेच कृतीत उतरेल. आपल्या मनामध्ये जे वाईट विचार असतील तर तेच आपले संस्कार बनतील, आणि आपली कृती त्याचे अनुकरण करेल. यातूनच मग सामाजिक उद्रेक, कौटुंबिक कलह अशा घटना घडत जातील. हे सर्व टाळायचे असेल, सुखी समाधानाने राहायचे असेल तर शांतचित्ताने राहावे. परमेश्वराने आपल्याला इतका सुंदर देह दिलेला आहे, त्याला मंदिराचे रूप द्यायचे असेल तर मनामध्ये परमेश्वरच असला पाहिजे .असे प्रतिपादन ह भ प तेलगाणे महाराज यांनी केले.

महाराजांनी नेहमीप्रमाणे आपल्या कीर्तनातून मानवाच्या आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येक जण बाल्यावस्थेत शिक्षणासाठी, किशोर अवस्थेमध्ये नोकरीसाठी, आणि प्रौढ अवस्थेमध्ये गृहस्त आश्रमासाठी वेळ देत असतो. मात्र तो परमेश्वराच्या भक्तीसाठी कधी वेळ देणार ? याचा विचार केला पाहिजे. तुम्ही जर हरिकीर्तन, हरी भजन , नामस्मरण आणि संत संगती करत असाल तर निश्चितच तुम्हाला मानसिक समाधान प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. जशी संगत असेल तशा पद्धतीची व्यक्ती घडत असते.

त्यासाठी संत संगतीची गरज आहे . आपापसातील मतभेद बाजूला ठेवून आपण सर्व परमेश्वराची लेकरे आहोत, ही भावना ठेवूनच प्रत्येकाने जीवन जगावे. आपल्या मध्ये ही भावना यावी यासाठी संतांनी “वसुधैव कुटुम्बकम” अर्थात हे सर्व विश्व माझे घर आहे, माझे कुटुंब आहे, असे सांगितले आहे. त्या संत वचनांचा आदर करून सर्व मानव जातीचाच नव्हे तर सर्व सजीव जीवांचा आदर करावा.

प्रत्येकाच्या बाबतीत त्यांचे भले कसे होईल, याचा विचार करावा. “भवतु सब्ब मंगलम” ही भावना ठेवून संपूर्ण जगाचे कल्याण होईल, अशा पद्धतीचे विचार मनात ठेवावेत. त्यामुळे आपले मन शुद्ध होईल. आपल्यामध्ये पवित्र विचार येतील. आणि आपले कुटुंब देखील सुखी समाधानी राहील. मन समाधानी असेल तर सर्व आजारापासून तो मुक्त असते, असेही ह भ प शरदकुमार तेलगाणे महाराज यांनी स्पष्ट केले.

About The Author

error: Content is protected !!