वीरमठ संस्थान आणि उपक्रमशील आदर्श शिक्षक रामलिंग तत्तापुरे यांना महाराष्ट्र शासनाचा महात्मा बसवेश्वर सामाजिक समता- शिवा पुरस्कार जाहीर
अहमदपूर (गोविंद काळे) : महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्यावतीने दिले जाणारे महात्मा बसवेश्वर सामाजिक समता शिवा पुरस्कार वैयक्तिक आणि संस्थेचे पुरस्काराचे लातूर जिल्ह्यात दोन मानकरी.
स्वर्गवाशी राष्ट्रसंत परम पूज्य डॉ .शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी जीवनभर समाजासाठी केलेल्या कार्याची पावती त्यांच्या संस्थेला वीरमठ संस्थेला सन 1918-19 चा पुरस्कार आणि यशवंत विद्यालय अहमदपूर येथील उपक्रमशील आदर्श शिक्षक जेष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते श्रीयुत रामलिंग बापूराव तत्तापुरे यांच्या शैक्षणिक, सामाजिक, संस्कृतिक ,धार्मिक कार्याचे मूल्यमापन करून त्यांना 2020-2021 चा महात्मा बसवेश्वर सामाजिक समता शिवा पुरस्कार नुकताच जाहीर करण्यात आला आहे.
या पुरस्काराचे स्वरूप व्यक्तीला पंचवीस हजार रुपये रोख, संस्थेला 51 हजार रुपये रोख, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ आणि पुष्पहार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान केला जाणार आहे.
सदरचा पुरस्कार वितरण सोहळा मुंबई येथे जुलैच्या पहिल्या आठवड्यात यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभाग्रहात मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे ,उपमुख्यमंत्री अजित पवार शिवा संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे .
पुरस्काराचे आलेले25 हजार रुपयांची रक्कम दीन, दलित ,उपेक्षित, गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी देणार असल्याचे पुरस्कार विजेते श्री राम तत्ता पुरे यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
