महात्मा फुले राष्ट्रीय साहित्य पुरस्काराचे माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव यांच्या हस्ते वितरण
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या मराठी विभाग व शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सुरू करण्यात आलेल्या महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय साहित्य पुरस्काराचे वितरण माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव यांच्या हस्ते होणार आहे. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ वसंत बिरादार पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली महाविद्यालय शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा आदी क्षेत्रात यशस्वी कामगिरी करीत, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परिक्षेत्रात नावलौकिक प्राप्त केला आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शिवजयंती महोत्सव समिती व मराठी विभागाच्या वतीने महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय साहित्य पुरस्कार नुकतेच घोषित करण्यात आले. या पुरस्काराचे वितरण दि. १९ जुन २०२२ रोजी महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीरचे अध्यक्ष श्रीरंगराव पाटील एकंबेकर हे आहेत तर किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीर चे सचिव ज्ञानदेव झोडगे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. महात्मा फुले राष्ट्रीय साहित्य पुरस्काराचे मानकरी नाशिक येथील प्रा. डॉ. प्रतिभा जाधव, अमरावती येथील संजय महल्ले, औरंगाबाद येथील प्रा. डॉ. रामकिसन दहिफळे तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय साहित्य पुरस्काराचे मानकरी जळगाव येथील उषा हिंगोणेकर, नाशिक येथील संजय चौधरी, औरंगाबाद येथील हबीब भंडारे, यवतमाळ येथील डॉ. युवराज मानकर तसेच शिरूर ताजबंद येथील प्रा. विद्या बयास ठाकूर यांना जाहीर करण्यात आले आहेत. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील तसेच संयोजक प्रो. डॉ.अनिल मुंढे व डॉ. मारोती कसाब यांनी दिली आहे.
