डॉ.सौ. रेखा रेड्डी शिक्षणक्षेत्रातही उल्लेखनीय कार्य करतील – सौ.दिपाली औटे
उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर येथील ख्यातनाम डॉक्टर रेखा रमण रेड्डी या सामाजिक क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. तशाच पद्धतीने किंबहुना त्यापेक्षाही चांगल्या पद्धतीने शिक्षण क्षेत्रात त्या कार्य करतील. असा विश्वास राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीच्या उदगीर आध्यक्षा सौ दिपाली औटे यांनी व्यक्त केला.
त्या सौ. रेखा रमण रेड्डी यांची महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल सत्कार करताना बोलत होत्या. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अभिजीत औटे हे उपस्थित होते.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, सौ. रेखा रमण रेड्डी या उच्चविद्याविभूषित असून त्यांचा संपूर्ण परिवार उच्चविद्याविभूषित आहे. त्यांचे वडील ऍड मनोहरराव गोमरे हे ज्येष्ठ विचारवंत आणि सामाजिक विचारधारेतील ख्यातनाम व्यक्तीमत्व असून त्यांनी लातूर येथे शिक्षण क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य केले आहे. तो वारसा घेऊन डॉ. रेखा रमण रेड्डी या उदगीर शहरात शिक्षणक्षेत्रात उल्लेखनीय कार्य करतील. असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना रेखा रेड्डी म्हणाल्या की, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी ची खरी ओळख महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या नावाने आहे. डॉ ना. य. डोळे यांच्या कार्यकाळातच महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय राज्यपातळीवर नावलौकिक मिळवणारे उदगीर चे पहिले महाविद्यालय होते. ते गतवैभव प्राप्त करून देण्याच्या दृष्टीने विद्यमान कार्यकारिणी सर्वतोपरी प्रयत्न करेल, अशी खात्री मला वाटते. या शैक्षणिक संस्थेच्या पवित्र क्षेत्रात राजकीय विचारधाराचे जोडे परिसराच्या बाहेर सोडून सर्वजण काम करतील.आम्ही वेगवेगळ्या राजकिय विचारधारेचे,राजकिय पक्षातून राजकारण जरी करत असलो तरी,विकास आणि विद्यार्थ्यांचे भवितव्य डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू माणून,त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी,व्यक्तीमत्व विकासासाठी आम्ही एकदिलाने काम करू, असा आपल्याला विश्वास वाटतो. असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी अभिजीत औटे यांनीही समयोचित मनोगत व्यक्त केले. अभिजीत औटे मित्र मंडळाच्या वतीने या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
