अनुउत्तीर्ण विद्यार्थ्यांची पुरवणी परिक्षा घेवून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे
एन एस यु आय चे जिल्हा उपाध्यक्ष रामराजे काळे यांची वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या कडे मागणी
मुंबई/ लातूर (प्रतिनिधी) : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडच्या मागच्या चार सत्राच्या परिक्षा या कोरोना काळात ऑनलाईन बहुपर्यायी पध्दतीने झाल्या आहेत व त्यानंतर सुध्दा महाविद्यालयाच्या तासिका ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने झाल्या आहेत.
याच काळात महाराष्ट्रात एस. टी. कामगार संपावर असल्याकारणाने ग्रामीण भागातील विद्यार्थी महाविद्यालयात पुर्णवेळ उपस्थित राहू शकले नाहीत, दरम्यानच्या काळात महाविद्यालयाचा अभ्यासक्रम 50 ते 60 टक्के शिकवून पुर्ण झाला. कोरोना काळात परिक्षा ऑनलाईन बहुपर्यायी पध्दतीने झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे लेखनाची सवय मोडली आहे.
सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशामुळे व शिक्षण संचालकच्या दि. 01 जून 2022 रोजी झालेल्या बैठकीकडे सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष लागले होते. परिक्षेच्या दिवशीपर्यंत परिक्षा दिर्घोत्तरी होणार की बहुपर्यायी पध्दतीने होणार ? या प्रश्नामुळे संपूर्ण विद्यार्थी मानसिक संभ्रमात राहिले आहेत.
शिक्षणमंत्री उदय सामंत यांनीनी परिक्षेच्या आगोदर विद्यार्थ्यांना प्रश्नसंच पुरविण्यात यावेत हा आदेश दिला असताना सुध्दा विद्यापीठाकडून त्याचे पालन करण्यात आले नाही. त्याच बरोबर दोन पेपरमध्ये दोन दिवसांचा गॅप देण्याच्या सूचनाचेही पालन विद्यापीठाने केले नाही. अशा अनेक कारणामुळे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडच्या दि. 02 जून 2022 पासून सुरु झालेल्या उन्हाळी 2022 परिक्षेमध्ये विद्यार्थ्यांना अनेक आडचणींचा सामना करावा लागला. यामुळेच विद्यापीठाच्या परिक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थी नापास होण्याची टक्केवारी वाढणार असल्याचे दिसून येत आहे.
अंतीम वर्षातील विद्यार्थ्यांचे एक-दोन विषयामध्ये नापास झाल्यामुळे वर्ष वाया जाणार आहे. ही बाब लक्षात घेता विद्यापीठाचा निकाल लवकरात लवकर लावून त्यानंतर बारावीच्या धरतीवर विद्यार्थी हित समोर ठेवून एक विशेष संधी म्हणून आठ ते पंधरा दिवसात पुरवणी परिक्षा घेवून विद्यार्थ्यांचे होत असलेले शैक्षणिक नुकसान टाळावे अशी मागणी एन एस यु आय चे जिल्हा उपाध्यक्ष रामराजे काळे यांनी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या कडे एका पत्राद्वारे मागणी केली आहे.
