देशाला व समाजाला सध्या क्रांतिकारी विचारांच्या साहित्याची गरज – माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव
अहमदपूर (गोविंद काळे) : अस्वस्थेतूनच क्रांती होते आणि क्रांती निर्माण करणारे साहित्य आजचे साहित्यिक लिहित आहेत याचा निश्चितच देशाला समाजाला गरज असून त्याचा देशाला व समाजाला निश्चितच फायदा होणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव यांनी केले. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, ते महात्मा फुले महाविद्यालय अहमदपूरच्या शिवजयंती महोत्सव समिती व मराठी विभाग विभागाच्यावतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त सुरू केलेल्या पहिल्या महात्मा फुले राष्ट्रीय साहित्य पुरस्कार व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय साहित्य पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रसंगी बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीरचे अध्यक्ष श्रीरंगराव पाटील एकंबेकर हे होते तर किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीर चे सचिव ज्ञानदेव झोडगे तसेच जेष्ठ संचालक पी.टी. शिंदे व पृथ्वीराज अशोकराव पाटील एकंबेकर यांची व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील, उपप्राचार्य डॉ दुर्गादास चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी पुढे बोलतांना बाळासाहेब जाधव म्हणाले की, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची गरज सध्या देशाला आहे, कारण त्यांचे साहित्य व त्यांचे विचार क्रांतिकारी होते. फुलेंनी अस्वस्थतेचं चित्रण आपल्या साहित्यातून करून इंग्रजांविरुद्ध क्रांतीचा लढा दिला. आताही त्याच प्रमाणे समाजात निर्माण होणारी अस्वस्थता प्रखरपणे मांडण्याचे काम नवसाहित्यिकांनी केले पाहिजे. असेही ते म्हणाले. यावेळी प्रा. विद्या बयास – ठाकूर , डॉ. युवराज मानकर, प्र. प्राचार्य डॉ.रामकिशन दहिफळे, उषा हिंगोणेकर यांच्या कन्या ज्योती शिंदे, संजय महल्ले व प्रा.डॉ. प्रतिभा जाधव आदी पुरस्कार प्राप्त साहित्यिकांनी प्रातिनिधिक स्वरूपात आपले मनोगत व्यक्त केले.
तसेच किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे नवनियुक्त संचालक पृथ्वीराज पाटील एकंबेकर यांनी संस्थेच्या वतीने आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव यांच्या हस्ते महात्मा फुले राष्ट्रीय साहित्य पुरस्कार व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय साहित्य पुरस्काराचे वितरण करण्यात आले. महात्मा फुले राष्ट्रीय साहित्य पुरस्कार नाशिक येथील प्रा. डॉ. प्रतिभा जाधव, अमरावती येथील संजय महल्ले, औरंगाबाद येथील प्रा. डॉ. रामकिसन दहिफळे यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय साहित्य पुरस्कार जळगाव येथील उषा हिंगोणेकर, नाशिक येथील संजय चौधरी, औरंगाबाद येथील हबीब भंडारे,यवतमाळ येथील डॉ. युवराज मानकर व शिरूर ताजबंद येथील प्रा. विद्या बयास ठाकूर यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. तसेच मराठी विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात प्राप्त झालेल्या शोध निबंधाच्या संपादकीय’ जागतिक स्त्रीवाद आणि मराठी साहित्य’ या ग्रंथाच्या दोन खंडाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी केले तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय व पुरस्कार प्राप्त साहित्यिकांचा परिचय कार्यक्रमाचे संयोजक डॉ.मारोती कसाब यांनी करून दिला तर सूत्रसंचालन संयोजक ह. भ. प. प्रो. डॉ. अनिल मुंढे यांनी केले व आभार शिवजयंती महोत्सव समितीचे प्रमुख डॉ.बब्रुवान मोरे यांनी मानले. यावेळी लातूर, नांदेड जिल्ह्यातील साहित्यिक, साहित्यप्रेमी, विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालक तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
