शिंदे यांनी शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला – चंद्रकांत टेंगेटोल
उदगीर (प्रतिनिधी) : शिवसेनेचे नेते म्हणून मिरवणारे एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत गद्दारी करत वेगळा गट स्थापन करण्याचा प्रयत्न केला आहे. शून्यातून उभा राहिलेल्या शिवसेनेला संपवण्याची भाषा बोलणाऱ्या एकनाथ शिंदे ला संतप्त झालेल्या महिला, पुरुष शिवसैनिकांचा तळतळाट लागल्याशिवाय राहत नाही. त्यांनी अशी गद्दारी न करता परत यावे. असे आवाहन शिवसेनेचे उदगीर तालुका प्रमुख चंद्रकांत टेंगेटोल यांनी केले आहे.

महा विकास आघाडीमध्ये शिवसैनिकाला न्याय मिळत नाही, फरफट होते. अशी तकलादू कारणे पुढे करत शिंदे यांनी बंड नव्हे तर पक्षद्रोह केला आहे. पक्षासोबत गद्दारी केली आहे. अशा गद्दार सोबत कोणीही खरा शिवसैनिक जाऊ शकत नाही. ज्यांना प्रलोभन दिले असेल, भूलथापा दिले असतील, किंवा धाक दडपशाही केली असेल म्हणून काही लोक त्यांच्यासोबत गेले आहेत. मात्र आपण शिवसेनेच्या नावावर आतापर्यंत जगलो, आपले अस्तित्व शिवसेना आहे. हे विसरणाऱ्याना, या बंडखोर आमदारांना शिवसैनिक निश्चित जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत. असा इशाराही याप्रसंगी चंद्रकांत तेंगेटोल यांनी दिला आहे. उदगीरचीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून शिवसैनिक उद्धव साहेब ठाकरे यांच्या सोबत आहेत असेही त्यांनी स्पष्ट केले.
