सामाजिक न्यायावर आधारित राज्यकारभार करणारे आदर्श राजा राजर्षी शाहू महाराज – माजी प्राचार्य डॉ. व्ही. एल. एरंडे
अहमदपूर (गोविंद काळे) : सामाजिक लोकशाही निर्माण करणारे जगातील एकमेव राजे राजर्षी शाहू महाराज यांनी स्त्रियांना, बहुजनांना समतेची वागणूक देऊन एक सामाजिक क्रांती केली. यांचा राज्यकारभार सामाजिक न्यायावर आधारित होता. असे, स्पष्ट प्रतिपादन महाराष्ट्र महाविद्यालय निलंगा चे माजी प्राचार्य तथा ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आणि विचारवंत डॉ. व्ही. एल. एरंडे यांनी केले. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, ते महात्मा फुले महाविद्यालय अहमदपूरच्या समाजशास्त्र विभाग व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड च्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त तसेच लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीचे व सामाजिक न्याय दिवसाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात बीजभाषक म्हणून बोलत होते.
या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे होते तर या चर्चासत्राचे उद्घाटन जर्मनी येथील राजर्षी शाहू महाराज या विषयाचे अभ्यासक मनीष हटवर यांनी केले. यावेळी किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीर चे अध्यक्ष श्रीरंगराव पाटील एकंबेकर व सचिव ज्ञानदेव झोडगे गुरुजी यांची विशेष उपस्थिती होती.या चर्चासत्राच्या बीजभाषणा प्रसंगी डॉ. एरंडे म्हणाले की, राजर्षी शाहू महाराज यांनी आपला राज्यकारभार करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकीय सुधारणा चा इतिहास डोळ्यासमोर ठेवला तसेच सामाजिक सुधारणा संबंधी महात्मा फुले यांचे विचार अंगीकारले म्हणूनच शाहू महाराजांना लोकराजा राजर्षी होण्याचा बहुमान प्राप्त झाला. शाहू महाराजांनी अनिष्ट रूढी परंपरा चा समूळ नाश करत जातीवादाचा अंत केला ते खर्या अर्थाने सामाजिक क्रांतीचे जनक होते. असे ही ते म्हणाले.
या आंतरराष्ट्रीय चर्चासत्राच्या द्वितीय सत्राचे अध्यक्षस्थान स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड च्या समाजशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रो. डॉ. एन. टी. कांबळे यांनी भूषविले. या वेळी डॉ. बळीराम पवार, डॉ. एस.जी. अन्सारी, प्राचार्य डॉ. सविता मिश्रा (दार्जिलिंग पश्चिम बंगाल )यांनी प्रातिनिधिक स्वरूपात शोधनिबंधाचे वाचन केले. या आंतरराष्ट्रीय चर्चासत्राच्या अध्यक्षीय समारोपाप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील म्हणाले की, लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांनी लोकाभिमुख राज्य स्थापन करून ते राज्य खऱ्या अर्थाने रयतेचे राज्य होते. त्यांनी स्त्री, बहुजन, शेतकरी कष्टकरी आदींच्या उद्धाराचे कार्य करत महाराजांनी स्वराज्याचे सुराज्यात रूपांतर करण्याचे कार्य करून नव समाज निर्माण करण्याचे क्रांतिकारी केले. असेही ते म्हणाले. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत ‘लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज ‘ या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. या आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे प्रास्ताविक संयोजक तथा समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सतीश ससाने यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ.मारोती कसाब यांनी व उपस्थितांचे आभार प्रो. डॉ. अनिल मुंढे यांनी मानले. यावेळी देश-विदेशातून आभासी पद्धतीने दोनशेहून अधिक अभ्यासक, संशोधक, प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
