ठाकरे सरकारने जातीय तेढ निर्माण करणारे घेतलेले आदेश रद्द करावेत – निवृत्ती सांगवे
उदगीर (प्रतिनिधी) : आपले सरकार आता जाणारच असे गृहीत धरून ठाकरे सरकारने औरंगाबादचे नाव संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव केले. या ठरावाला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांनी देखील मूकसंमती देऊन या ठरावाला पाठिंबा दिला आहे. याबद्दल एम आय एम यांच्या वतीने विभागीय उपजिल्हाधिकारी यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आणि राष्ट्रपती भारत सरकार यांना एक निवेदन पाठवण्यात आले आहे. अशी माहिती एम आय एम चे माजी नगरसेवक तथा राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे प्रदेशाध्यक्ष निवृत्तीराव सांगवे सोनकांबळे यांनी दिली आहे.
सदरील निवेदनात मराठवाड्यातील महसूल विभाग औरंगाबाद ,उस्मानाबाद ही दोन ऐतिहासिक जिल्हा स्वातंत्र्यपूर्वकाळात अर्थात निजाम स्टेट अस्तित्वात असताना व त्याही पूर्वीपासून अस्तित्वात आहेत. आज तागायत आहेत. त्याचे नाव बदलून काहीही साध्य होणार नाही.
जातीवादी सरकारने नावे बदलून समाजामध्ये जातीयवाद व धर्मवाद पेटविण्याचे पाप केले आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी, मंत्र्यांनी मुस्लिमांची मते घेतली. मात्र मुस्लिम समाजाला विश्वासात न घेता मोठा धोका दिला आहे. समाजाचे ध्रुवीकरण ,मतांचे धृवीकरण करण्याचे राजकारण या सर्वांनी केले आहे. यापुढे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस च्या उमेदवारांना मुस्लिम समाज कधीही जवळ करणार नाही.
दलित मुस्लिम चळवळ एक होईल आणि येणाऱ्या राजकारणामध्ये नवीन समीकरण तयार होईल. अशी ही माहिती निवृत्तीराव सांगवे सोनकांबळे यांनी दिली आहे. ठाकरे सरकारने स्मशान घाईने जे निर्णय घेतले, जे समाज हिताचे नाहीत. किंवा अत्यावश्यक नाहीत. अशा सर्व ठरावांना रद्द करावे. अशीही मागणी करण्यात आली आहे. सदरील निवेदनावर मौलाना अजिज पटेल एम आय एम शहर प्रवक्ता, निवृत्तीराव सांगवे सोनकांबळे दलित अधिकार मंचेचे प्रदेशाध्यक्ष, बागवान जलील एमआयएम शहर उपाध्यक्ष, शेख अखिल शब्बीर मिया एमआयएम शहराध्यक्ष, फकीर हाशमी खाजा माजी नगरसेवक, मुसा पठाण एमआयएम कार्याध्यक्ष उदगीर, सय्यद सोफी मदारी, शेख सोहेल, संजय कुमार ,मानसिंग पवार इत्यादी मान्यवरांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
