आरोग्य विभागाच्या अतिसार नियंत्रण पंधरवड्यास सहकार्य करा – डाॅ.शरदकुमार तेलगाणे

आरोग्य विभागाच्या अतिसार नियंत्रण पंधरवड्यास सहकार्य करा - डाॅ.शरदकुमार तेलगाणे
      

उदगीर (एल.पी. उगीले) : पावसाळ्याची सुरूवात झाली आहे.या कालावधीत दुषित पाण्यामुळे विविध रोग पसरत असतात.त्यासाठी शासकिय आरोग्य विभागाच्या वतीने विविध योजना,उपक्रम राबवले जातात.त्यात सर्वांनी सहकार्याची भुमिका ठेवावी,असे आवाहन डाॅ.शरदकूमार तेलगाणे यांनी केले आहे.
राज्यातील अर्भक मृत्यू दर व बाल मृत्यू दर कमी करणे हे राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. देशातील 5 वर्षापर्यंतच्या बालकांच्या मृत्यू मागे अतिसार हे प्रमुख कारण असून सुमारे 7 टक्के बालके अतिसाराने दगावतात. त्या बाल मृत्युचे प्रमाण उन्हाळयात व पावसाळयात जास्त असते. यामुळे इ सन 2014 ते 2021 मध्ये घेण्यात आलेल्या अतिसार नियंत्रण पंधरवडयाच्या यशस्वीतेनंतर, या वर्षी अतिसारामुळे होणारे बालमृत्यू शुन्य करणे हे उद्दिष्ट ठेवून जिल्ह्यात 1 ते 15 जुलै 2022 या कालावधीत विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा राबविण्याचे ठरविले आहे.
या कालावधीत जनजागृती, अतिसारामध्ये घ्यावयाची काळजी तसेच क्षारसंजीवनी (ओआरएस) व झिंक गोळया यांचा वापर, कसा करावा? याबाबत आशा स्वयंसेविकां मार्फत प्रात्यक्षिके व ज्या घरात 5 वर्षापर्यंतची बालके आहेत. तेथे ओआरएस व झिंक गोळयांचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच सर्व प्रा.आ. केंद्र व आरोग्य संस्थेत ओ.आर.टी. कॉर्नर स्थापन करण्यात येणार आहे. अतिसार झालेल्या कुपोषित बालकांवर उपचार करणे इत्यादींचा समावेश आहे. यामध्ये ग्रामीण भागातील 178040 व शहरी भागातील 33252 अशा एकूण 211292 बालकांचा समावेश आहे.या मोहिमेत आशा स्वयंसेविका यांच्यामार्फत गावात प्रत्येक घरोघरी प्रत्येक दिवशी 100 ते 130 घरांना भेटी देण्यात येणार आहेत.
दर दिवशी कार्यक्षेत्रात घरातील पालकांना एकत्रीत करुन ओ.आर.एस. द्रावण तयार करुन दाखविले जाणार आहे. तसेच स्वच्छतेचे महत्व पटवून हात धुण्याचे प्रात्यक्षिकही करुन दाखविले जाणार आहे.या वेळी सर्वांनी सकारात्मक विचार ठेऊन यंत्रणेला सहकार्य करावे,असेही आवाहन ह भ प डाॅ.शरदकुमार तेलगाणे यांनी केले आहे.
या नियोजनासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. महादेव बनसोडे, महिला व बाल कल्याण विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.गिरी व उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.काळे तसेच जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय अधिक्षक, तालुका अरोग्य अधिकारी प्रयत्न करत आहेत.
आपल्याकडे येणार्‍या आशाताई असतील नाहीतर आरोग्यसेविका असतील त्यांना सहकार्य करा,वेळीच बाळांच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असल्याचेही या प्रसंगी डाॅ.शरदकुमार तेलगाणे यांनी सांगीतले.

About The Author

error: Content is protected !!