गुरूंमध्ये विद्यार्थ्यांबद्दल गुरुत्व, ममत्व आणि चुंबकत्व असावं – प्राचार्य डॉ. वसंत बिरादार
अहमदपूर (गोविंद काळे) : आजच्या काळात शिक्षण क्षेत्रामध्ये व्यावसायीकरण मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे विद्यार्थ्यांचा आपल्या शिक्षकाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत चाललेला आहे. भारतामध्ये गुरू-शिष्यांची फार मोठी परंपरा होती आणि आजही टिकून आहे. ती टिकून ठेवण्यासाठी गुरुंमध्ये विद्यार्थ्यांबद्दल गुरुत्व, ममत्व आणि त्यांना आपल्या ज्ञानाकडे खेचण्याचे चुंबकत्व आवश्यक आहे. असे स्पष्ट प्रतिपादन महात्मा फुले महाविद्यालय अहमदपूरचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी केले. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, महात्मा फुले महाविद्यालय अहमदपूरच्या संस्कृत विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गुरू पौर्णिमा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.वसंत बिरादार पाटील हे होते. तर इतिहास विभाग प्रमुख तथा योगगुरू डॉ. बब्रुवान मोरे, मराठीचे जेष्ठ कवी डॉ. मारोती कसाब यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अध्यक्ष समारोपप्रसंगी बोलताना प्राचार्य डॉ.वसंत बिरादार पाटील पुढे म्हणाले की, समाजामध्ये गुरूंचे स्थान फार मोठे आहे. आपले प्रथम गुरू आई – वडील आणि त्यानंतर आपल्याला ज्यांच्याकडून जीवनाचे ज्ञान शिकायला मिळतं असे समाजातील सर्व घटक आपल्या गुरू स्थानी असतात. या गुरूंचे ऋण आपण कधीही फेडू शकत नाही, असेही ते म्हणाले. याप्रसंगी इतिहास विभागप्रमुख डॉ. बब्रुवान मोरे यांनी तसेच मराठीचे ज्येष्ठ कवी प्रा.डॉ. मारोती कसाब यांनी ही गुरूपौर्णिमे निमित्त गुरूंचे महत्त्व विस्ताराने विशद केले. यावेळी प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी यांचा गुरूपौर्णिमे निमित्त गुलाबपुष्प देऊन सन्मान केला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन उपप्राचार्य,नॅक कॉर्डिनेटर डॉ. दुर्गादास चौधरी यांनी केले तर आभार संस्कृत विभाग प्रमुख डॉ. प्रशांत बिरादार यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
