सत्ता सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून सेवाभावाने करावी – आ.संजय बनसोडे
उदगीर (एल. पी. उगिले) : लोकप्रतिनिधींनी सर्वसामान्य माणसांनी आपल्याला सत्ता हातात दिली आहे. तेव्हा या सत्तेवर खऱ्या अर्थाने सर्वसामान्य माणसांचा अधिकार आहे. आपल्या सत्तेचा खरा वापर गोरगरिबांचे कल्याण करण्यामध्ये, त्यांचे हित करण्यामध्ये, त्यांचा विकास करण्यामध्येच झाला पाहिजे. सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू ठरवून कामे केल्यास सर्वांना न्याय मिळू शकतो. निवडणुकांमध्ये फक्त आणि फक्त निवडणूकितच राजकीय पक्ष,निवडणुका पूर्ण होईपर्यंत राजकीय पक्षाचा विचार करावा. निवडणुका संपल्यानंतर आपण संपूर्ण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आहोत. ही भावना ठेवून सर्वांचा विकास करण्यासाठी प्रयत्न करावा, आणि तो मी करतो आहे. असे विचार उदगीरचे आमदार तथा माजी राज्यमंत्री संजयजी बनसोडे यांनी व्यक्त केले.
उदगीर विधानसभा मतदारसंघातील 129 गावांसाठी 480 कोटी 96 लाख 28 हजार इतक्या किमतीचे नळ पाणीपुरवठा योजनेचे काम मंजूर केल्याबद्दल उदगीर, जळकोट तालुक्यातील विविध संघटना आणि कार्यकर्त्यांच्या वतीने आ. संजय बनसोडे यांचा भव्य दिव्य असा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ते जमावाला उद्देशून बोलत होते.
पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, हा सत्कार माझा नसून माझ्यावर प्रेम करणाऱ्या उदगीर विधानसभा मतदारसंघातील सर्व कार्यकर्त्यांचा आहे. अशा सत्काराने सकारात्मक काम करण्यासाठी ऊर्जा मिळते, आणखी काम करावे अशी प्रेरणा मिळते. आपण पांघरलेली मायेची शाल ही मला सतत जनसामान्यांच्या विकासासाठी काम केले पाहिजे, याची आठवण करून देईल. आणि मी सदैव जनसामान्यासाठी कार्यरत आहे, भविष्यातही राहीन. सत्ता असो अगर नसो, उदगीर विधानसभा मतदारसंघातील विकासाची कामे कधीच आडणार नाहीत, याची ग्वाही देखील याप्रसंगी त्यांनी दिली.
या नळ पाणी पुरवठा योजनेस महाराष्ट्र शासनाने 22 जून 2022 रोजीच्या आदेशान्वये तांत्रिक मान्यता प्रधान केली आहे. तसेच सचिव महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या अध्यक्षतेखाली तांत्रिक छाननी समितीच्या दिनांक 15 जून 2022 रोजी च्या बैठकीत देखील या योजनेला मंजुरी देण्यात आलेली आहे.
129 गावातील नागरिकांना नळाद्वारे पाणीपुरवठा या योजनेला मंजुरी दिली असल्याचे त्यांनी सांगितले. या कामामुळे नागरिकांना निर्जंतुक पाणी पिण्यासाठी उपलब्ध होईल, त्यामुळे दूषित पाण्यामुळे होणारे रोग टाळले जातील.ग्रामीण भागातील नागरिकांचा आरोग्याचा विषय हा मूलभूत प्रश्न आहे. त्या दृष्टीने जलशुद्धीकरण प्रक्रियेच्या नंतर दिले जाणारे नळाच्या साह्याने घरोघर पाणीपुरवठा ही मोठी जबाबदारीची कामगिरी आपल्या हातून पार पडल्याबद्दल आपल्याला आनंद वाटतो आहे, असे त्यांनी याप्रसंगी स्पष्ट केले.
उदगीर विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात विकासाची गंगा पोहोचली पाहिजे. या दृष्टीने आपले प्रयत्न असणार आहेत. उदगीर विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी आपण आराखडा तयार केला आहे. त्या आराखड्यानुसार काम चालू असून विधानसभा निवडणुकीच्या अगोदर दिलेल्या आश्वासनांची जवळपास सर्व पूर्तता झाली आहे. आता आश्वासनांची मर्यादा विसरून, जनतेच्या हितासाठी जे जे म्हणून करता येईल ते ते करण्याचा प्रयत्न करायचा आहे. मंत्रीपद गेल्याने विकास खोळंबेल, असे कोणी समजू नये. मंत्रीपद नसताना देखील विकासाची कामे चालूच राहतील. याची ग्वाही आपण देतो असे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी बसवराज पाटील नागराळकर, गजानन सताळकर, उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सिद्धेश्वर उर्फ मुन्ना पाटील, उदगीर खरेदी विक्री संघाचे चेअरमन तथा महाराष्ट्र राज्य कापूस फेडरेशन चे संचालक भरत भाऊ चामले, रामेश्वर बिरादार जकनाळकर, श्रीकांत पाटील, प्रा. प्रवीण भोळे, शेख समीर, ज्ञानेश्वर पाटील धनेगावकर,सय्यद जॉनी मिया, कुणाल बागबंदे, शेख एजाज, धनाजी बनसोडे, जळकोट बाजार समितीचे संचालक गजानन दळवे पाटील, वीरेश पाटील सोमनाथपुरकर, राजकुमार बिरादार इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
उदगीर तालुक्यातील आणि जळकोट तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुसंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भव्य दिव्य अशा स्वरूपाचा सत्कार याप्रसंगी नागरिकांच्या वतीने ऋणनिर्देशाच्या स्वरूपात करण्यात आला.
पुढे बोलताना आ. संजय बनसोडे यांनी स्पष्ट केले की, गेल्या कित्येक वर्षापासून उदगीर विधानसभा मतदारसंघाचा विकास म्हणावा त्या गतीने न झाल्याने विकासाचे अनेक प्रश्न शिल्लक आहेत, ते प्रश्न मूलभूत असून ते सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. उदगीर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, तो विश्वास सार्थ करून दाखवण्यासाठी आपण अहोरात्र प्रयत्न करू. असे आश्वासनही याप्रसंगी त्यांनी दिले.
