पोलीस प्रशासनाच्या वतीने इच्छापूर्ती कोचिंग क्लासेस येथे उदगीरमधील सर्व क्लासेस संचालकांची बैठक संपन्न
उदगीर ( प्रतिनिधी ) : सध्या क्लासेस परिसरात चालू असलेल्या सैराट मुलांचा बंदोबस्त करणे,18 वर्षाखालील मुलांना गाडी न देणे, मुलींची छेडछाड रोखणे, 15 ते 20 वर्ष वयातील मुलांना गुन्हेगारी प्रवृत्ती पासून रोखणे इत्यादी विषयावर चर्चा व मार्गदर्शन करण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने उदगीरमधील सर्व क्लासेस संचालकांची बैठक बोलवण्यात आली होती.
ही बैठक शनिवार दि.16/07/22 रोजी इच्छापूर्ती कोचिंग क्लासेस येथे संपन्न झाली. क्लासेस संचालकांच्या या बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी.डॅनिअल जॉन बेन साहेब, उदगीर शहरचे पोलीस निरीक्षक(PI) मा.गोरख दिवे , उदगीर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक दिपककुमार वाघमारे हे उपस्थित राहून क्लासेस संचालकांच्या अडचणी ऐकून घेऊन त्या अडचणीसह अन्य महत्वाच्या विषयावर अनमोल असे मार्गदर्शन केले.क्लासेस संचालकांना कांही आवश्यक व योग्य अशा सूचना दिल्या. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पीटीएचे राज्य उपाध्यक्ष प्रा.गोपाळकृष्ण घोडके हे होते. तर बैठकीचे आयोजन पोलीस निरीक्षक गोरख दिवे यांच्या सुचनेनुसार प्रा.सिध्देश्वर पटणे यांनी केले होते.
या बैठकीस जवळपास 70क्लासेस संचालक उपस्थित होते. सर्व क्लासेस संचालकांच्या समक्ष या बैठकीत सर्व क्लासेस संचालकांना क्लासेसच्या बिल्डिंग मध्ये तसेच परिसरात सिसिटीव्ही कॅमेरे बसवून घ्यावेत, असे सांगण्यात आले, जर कोण्या क्लासेस समोर किंवा परिसरात गोंधळ चालू असेल तर तात्काळ 112 हा नंबर डाईल करा. म्हणजे दहा मिनिटाच्या आत पोलिसांनी नेमलेली चार्ली टीम तिथे उपस्थित होऊन योग्य ते सहकार्य करेल, मुलांच्या पालकांचा पालक मेळावा घेऊन18 वर्षा खालील मुलांना गाडी द्यायची नाही, असे सांगणे व गाडी दिल्यास त्याचे परिणाम किती गंभीर आहेत, व त्यांची सजा भोगण्याची वेळ पालकांवर कशी येते? हे समजावून सांगणे.
मुलींची छेडछाड होत असेल तर छेडछाड करणाऱ्याचे नाव, मोबाईल नंबर पोलीस प्रशासनास कळवणे त्यावर योग्य ती कार्यवाही पोलीस प्रशासन करेल. इत्यादी विषयावर सविस्तर चर्चा झाली. त्याचे पालन करायचे ठरले.
अध्यक्षीय समारोपात प्रा.गोपाळकृष्ण घोडके यांनी पोलीस प्रशासनाने सांगिलेल्या सर्व सूचनांचे आम्ही सर्व क्लासेस संचालक काटेकोर पालन करू असा शब्द सर्व कोचिंग क्लासेसच्या वतीने दिला. या बैठकीचे प्रास्ताविक प्रा.सिद्धेश्वर पटणे यांनी केले. सुत्रसंचलन प्रा.संजय जामकर तर आभार प्रदर्शन प्रा.शंकर मोरे यांनी केले.
