साहेब तुम्हाला हे शोभतय का? जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून सेवानिवृत्त कर्मचारी यांचा छळ
उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर तालुक्यातील सहकारी पतसंस्था वर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखा व्यवस्थापकाची नियुक्ती प्रशासक म्हणून करण्यात आली होती. मात्र दुर्दैवाने हे प्रशासक आपला रूबाब दाखवून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रचंड छळ करत आहेत. हे चित्र समोर येत आहे. दुर्दैवाने दिलीपराव देशमुख म्हणजे शेतकरी यांचे दैवत समजले जाते. त्यांच्या बँकेतील झारीतील शुक्राचार्यांनी कर्मचाऱ्यांचा छळ करणे, दिलीपराव देशमुख साहेबांच्या प्रतिमेला ही गोष्ट काळीमा फासणारी आहे. असे असले तरीही हा मग्रूर आणि मस्तवाल शाखाधिकारी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना छळत आहे. त्यांचे राजीनामे मंजूर करत नाही. त्यांच्या ठेवी परत करत नाही. यामुळे त्यांचा होणारा आर्थिक छळ कधी थांबणार? यासंदर्भात हे सर्वजण मिळून लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांच्याकडे न्याय मागणार असल्याची तक्रार काही सेवानिवृत्त कर्मचारी यांनी दिली आहे.
यामध्ये प्रामुख्याने एल. एस. कांबळे, एस .एस, वाकळे, जाधव के. बी .यांनी केली आहे. वास्तविक पाहता सेवानिवृत्त झाल्यानंतर त्या कर्मचाऱ्याला आर्थिक स्थैर्य देण्याच्या दृष्टीने लोकनेते स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब सतत प्रयत्न करायचे! तो आदर्श डोळ्यासमोर ठेवून दिलीपराव देशमुख देखील आपला आदर्श कायम ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. असे असतानाही त्यांच्या हाताखालचे झारीतले शुक्राचार्य मात्र आर्थिक फायदा घ्यावा, आणि स्वार्थ साधावा म्हणून सेवानिवृत्त कर्मचाऱ्याकडूनही काही मिळते का? या दृष्टीने प्रयत्न करत आहेत. ही अत्यंत शोकांतिका आहे. उदगीर येथील पूर्वीच्या चोबारा शाखा आणि सद्यस्थितीतील मार्केट शाखेतील व्यवस्थापक सोलापूर यांनी या प्रकरणात कुठलेही संस्थेचे काम केले नाही. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या महाव्यवस्थापक आणि इतर अधिकाऱ्यांनी त्यांना वेळोवेळी सेवानिवृत्त कर्मचारी यांचा छळ करू नका. त्यांनी केलेल्या कामाप्रमाणे त्यांना मोबदला द्यावा. अशा सूचना केलेल्या असताना देखील त्यांनी त्यांना प्रतिसाद दिला नसल्याची तक्रार संबंधित कर्मचाऱ्यांनी केली आहे.
यासंदर्भात कार्यालयीन कर्मचारी सुभाष पाटील यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे श्रीमाळी, श्री उगिले आणि अधिकार्यांशी संपर्क साधून आपल्यावर झालेल्या अन्यायाची तक्रार केली. मात्र कोणीही या तक्रारीला दाद दिली नाही. सद्यस्थिती सुभाष पाटील यांच्या मुलीचे लग्न असल्यामुळे त्यांची आत्तापर्यंत थकित असलेले मानधन आणि पगार मिळाले तर त्यांना न्याय मिळेल. या दृष्टीने प्रयत्न करत आहेत. अत्यंत हालाखीच्या पद्धतीने जगत असलेले सुभाष पाटील यांचा छळ जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्मचार्यांनी चालवल्यामुळे या कर्मचाऱ्याला आता लग्नकार्यासाठी पैसे मिळत नसल्याने आत्महत्येशिवाय पर्याय नाही. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. याला एकमेव जबाबदार म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मार्केट शाखेचे शाखा अधिकारी तथा संबंधित पतसंस्थेचे प्रशासन हेच जबाबदार आहेत.
दिलीपराव देशमुख साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या एवढ्या मोठ्या बँकेत असा गैरप्रकार आणि मग्रुरी अपेक्षित नसल्याची तक्रारही सेवानिवृत्त कर्मचारी आणि पिळवणूक झालेले पीडित सुभाष पाटील यांनी केली आहे.