लामजना ते तपसे चिंचोली रस्त्याची प्रचंड दुरवस्था
रस्ता खचून जाण्याने वाहन चालवताना जातोय तोल स्थानिक ग्रामस्थांसह वाहनचालक कमालीचे त्रस्त
लामजना (प्रशांत नेटके) : औसा तालुक्यातील लामजना ते तपसे चिंचोली या रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली असून मोठमोठे खड्डे पडले आहेत.अनेक ठिकाणी रस्ता खचून जाण्याने वाहन चालवताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
औसा तालुक्याच्या ग्रामीण भागातील रस्ते विकासापासून अनेक कोस दूर आहेत.त्यामुळे ग्रामस्थ ,प्रवासी वर्गातून लोकप्रतिनिधींबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. लामजना ते तपसे चिंचोली या रस्त्यावर जागोजागी मोठमोठाले खड्डे पडले असून या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच संबंधित यंत्रणेकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.त्यामुळे सर्वसामान्य माणसाला नादुरुस्त रस्त्यावरून जाणे कठीण होत आहे. त्यामुळे ह्या रस्त्याची दुरुस्ती कधी होईल असा गंभीर प्रश्न सर्वसामान्य जनतेकडून उपस्थित केला जात आहे. “स्थानिक लोकप्रतिनिधी व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना रस्त्याची दुर्दशा माहीत असतांना देखील आजपर्यंत कसल्याही प्रकारची दुरुस्ती होत नाही ? या रस्त्याची दैना कधी संपेल ?” असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांतुन विचारला जात आहे.