मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अण्णाभाऊंचे सर्वश्रेष्ठ योगदान – मारोती कसाब

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अण्णाभाऊंचे सर्वश्रेष्ठ योगदान - मारोती कसाब

अहमदपूर (गोविंद काळे) : मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचे षडयंत्र अनेक वर्षांपासून सुरू असून, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा यासाठी १९४८ पासून सुरू झालेल्या लोकलढ्यात आपल्या शाहीरीच्या माध्यमातून लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी दिलेले योगदान सर्वश्रेष्ठ आहे, असे प्रतिपादन आघाडीचे चळवळीतील विद्रोही कवी व समीक्षक डॉ. मारोती कसाब यांनी केले.

भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीतील महत्त्वाचे नेते व भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृती दिनानिमित्त व मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील अग्रगण्य नेते, लोक लेखक व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त येथील महात्मा फुले महाविद्यालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमात विद्रोही कवी व समीक्षक डॉ. मारोती कसाब बोलत होते. यावेळी झालेल्या अभिवादन सभेचे अध्यक्षस्थान महाराष्ट्रातील ख्यातनाम लेखक, समीक्षक महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी भूषविले. तर प्रमुख पाहुणे व वक्ते म्हणून डॉ. मारोती कसाब यांची उपस्थिती होती. यावेळी अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी लोकमान्य टिळक व अण्णा भाऊ साठे यांच्या जीवन कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करत महामानवांच्या विचारांनीच समाजात परिवर्तन घडवून आणता येईल असे प्रतिपादन केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. बब्रुवान मोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. अनिल मुंढे यांनी केले. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. डी. डी. चौधरी, कार्यालयीन अधीक्षक प्रशांत डोंगळीकर यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते.

About The Author