महात्मा फुले महाविद्यालयात देशभक्त सुभेदार हनुमंतराव भंडे यांचा सत्कार

महात्मा फुले महाविद्यालयात देशभक्त सुभेदार हनुमंतराव भंडे यांचा सत्कार

अहमदपूर (गोविंद काळे) : देशभक्तीच्या उत्कट प्रेरणेतून भारतीय सैन्य दलात भरती होऊन प्रगतीची अनेक टप्पे पार करीत सुभेदार या पदावरून नुकतेच सेवानिवृत्त झालेले लातूर जिल्ह्याचे सुपुत्र सुभेदार दे.भ. हनुमंतराव भंडे यांचा येथील महात्मा फुले महाविद्यालयात भव्य सत्कार करण्यात आला. याबाबतचे अधिक वृत्त असे की भारतीय सैन्य दलामध्ये गेली २८ वर्षे सेवा करून, विविध लढायांमध्ये सक्रिय सहभाग घेतलेले व भारतीय सैन्य दलाकडून अनेक मेडल्स मिळविलेले लातूर जिल्ह्याचे भूमिपुत्र सुभेदार हनुमंतराव भंडे हे नुकतेच सेवानिवृत्त झाले असून, त्याबद्दल त्यांचा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील व माजी सैनिक रावसाहेब पाटील मादलापूरकर यांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला.

महाविद्यालयाच्या इतिहास विभागाच्या वतीने झालेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी भूषविले. त्यांच्या हस्ते दे.भ. सुभेदार भंडे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना सुभेदार भंडे यांनी भारतीय सैन्य दलातील कामगिरीबद्दल, तसेच इथोपिया आणि श्रीलंका या देशात शांती सैनिक म्हणून आलेल्या विविध अनुभवांचे कथन केले.

अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी देशभक्त सुभेदार भंडे यांच्या भारतीय सैन्य दलातील नेत्रदीपक कामगिरीचा यथोचित गौरव केला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग, स्पर्धा परीक्षा प्रमुख, छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्राचे संचालक आणि या कार्यक्रमाचे संयोजक इतिहास विभाग प्रमुख डॉ. बब्रुवान मोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. सतीश ससाणे यांनी केले. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी, कार्यालयीन प्रमुख प्रशांत डोंगळीकर यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते.

About The Author