लातूर पोलिसांनी घेतली ट्युशन एरियातील खाजगी कोचिंग क्लासेस, हॉस्टेल व मेस चालविणार्याची बैठक

लातूर पोलिसांनी घेतली ट्युशन एरियातील खाजगी कोचिंग क्लासेस, हॉस्टेल व मेस चालविणार्याची बैठक

लातूर (प्रतिनिधी) : दि. 3 आॅगस्ट रोजी लातूर शहरातील अष्टविनायक मंदिर परिसरात असलेल्या खाजगी कोचिंग क्लासेस हॉस्टेल व मेस चालकांची पोलीस अधीक्षकांनी बैठक घेतली. कोरोना काळात असलेले निर्बंध कमी झाल्याने खाजगी क्लासेसला येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्या अनुषंगाने ट्युशन एरियातील अष्टविनायक मंदिर परिसरात असलेल्या एका सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

सदर बैठकीस विविध कोचिंग क्लासेसचे संचालक,शिक्षक तसेच हॉस्टेल व मेस चलविणाऱ्यांचा सहभाग होता. सदर बैठकीत पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी ट्युशन एरियातील विविध समस्या तसेच कोचिंग क्लासेस हॉस्टेल व मेस चलविणाऱ्याच्या शिकवणीसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या कर्तव्य व जबाबदाऱ्या याबाबत उहापोह करण्यात आला.

लातूर पॅटर्न मध्ये कोचिंग क्लासेसचा सुद्धा खूप मोठा सहभाग आहे. लातूर मधील कोचिंग क्लासेसला येणाऱ्या विद्यार्थ्यांची दिवसा दिवस संख्या वाढतच आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोचिंग क्लास चलविणाऱ्यांनी ट्युशन एरियामध्ये लोकसहभागातून सीसीटीव्ही कॅमेरे अपडेट करून ते चालू करून घ्यावे. शिकवणीसाठी येणारे विद्यार्थ्यांच्या मोटरसायकली व वाहनामुळे वाहतुकीची समस्या निर्माण होत असल्याने कोचिंग क्लासेस वाल्यांनी पार्किंगची व्यवस्था करावी. कोचिंग क्लासेस चालविणाऱ्यांना काही समस्या किंवा तक्रार असेल तेव्हा थेट पोलिसांशी संपर्क करावा.

सध्या मोठ्या प्रमाणात शिक्षण क्षेत्रात स्पर्धा निर्माण झाली आहे. त्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी शिकवणीला येणाऱ्या विद्यार्थ्यावर प्रचंड ताण असतो. त्यामुळे त्यांचे मानसिक आरोग्य बिघडण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे कोचिंग क्लासेसनी काही ठराविक कालावधीनंतर विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करणाऱ्या कार्यक्रमांचे किंवा शिबिराचे आयोजन करून विद्यार्थ्यांचे तणाव कमी करता येते का याचा विचार करावा. विद्यार्थ्यांचे सामाजिक व मानसिक आरोग्याकडेही लक्ष द्यावे. जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये तणाव निर्माण होऊन काही अनुचित घटना घडणार नाही. कोचिंग क्लासेस, हॉस्टेल येथे महिला काम करत असतील तेथे विशाखा समितीची स्थापना करावी.

पोलीस प्रशासनातर्फे ट्युशन एरिया मध्ये पोलीस चौकीची कार्यरत असून सर्व कोचिंग क्लासेसना ती चौकी आपलाच घटक वाटणे आवश्यक आहे. सदर पोलीस चौकीत सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या दोन अधिकाऱ्यांची, चार पोलीस अमलदारांची नेमणूक करण्यात आली आहे.

काही कालावधीपूर्वी ट्युशन एरिया मध्ये उपद्रव करणाऱ्या टोळक्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर मोक्का सारख्या कठोर कायद्यानुसार कार्यवाही करण्यात आलेली आहे असे सांगून कोचिंग क्लासेसनी एकमेकांमध्ये फक्त यशवंत विद्यार्थ्यांच्या संख्येवरून स्पर्धा करणे सोबतच आपला ट्युशन एरिया अजून आधुनिक, सुरक्षित, सक्षम कसे करू शकतो याचा देखील विचार करून लातूर पॅर्टन कोटा पॅर्टन पेक्षा पुढे जायला पाहिजे यासाठी आपण शिक्षणा सोबतच विद्यार्थ्यांचे शारीरिक व मानसिक सुरक्षेच्या विचार करणे आवश्यक असल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले.

या बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर जितेंद्र जगदाळे, पोलीस ठाणे शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक दिलीप डोलारे , सहाय्यक पोलीस निरीक्षक दयानंद पाटील, प्रवीण राठोड तसेच कोचिंग क्लासेस चे संचालक, शिक्षक हॉस्टेल व मेस चे संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author