सीमावर्ती भागात ओला दुष्काळ जाहीर करा – लक्ष्मण वाडीकर
उदगीर (प्रतिनिधी) : सीमावर्ती भागात गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान देणे गरजेचे असून हा भाग पूर्ण ओला दुष्काळ जाहीर करावा. अशी मागणी भारत कृषी समाज कर्नाटक राज्याचे कमालनगर अध्यक्ष अंकुश वाडीकर यांनी केली आहे.
अंकुशराव वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली दापका येथे उप तहसीलदार सोमशेखर तसेच गिरिदावर संजीव राठोड, तलाठी विठ्ठल यांना निवेदन देऊन हा भाग ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा. अशा पद्धतीची मागणी करण्यात आलेली आहे.
सन 22- 23 यावर्षी अतिवृष्टी झालेली असून गेल्या वर्षीही शेतकरी अतिवृष्टीमुळेच कंगाल झालेला आहे. शेतकऱ्यांची अवस्था ही दयनीय झालेली आहे. शेतकऱ्याला सध्या कोणीही वाली उरलेला नाही. अशा परिस्थितीमध्ये शेतकरी निराश होऊन आत्महत्या करू शकतो, ही मानसिकता विचारात घेऊन सीमावर्ती भागात तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा.
तसेच शेतकऱ्यांना आर्थिक सहकार्य करावे. अशीही मागणी त्यांनी केली आहे. दोन महिन्यात पावसाने दुप्पट सरासरी ओलांडली आहे. त्यामुळे शेतामध्ये कोणत्याही पिक योग्य प्रमाणात येणे शक्य नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये सरसकट अर्थसाह्य द्यावे. अशी मागणी करण्यात आली असून 20 ऑगस्ट पर्यंत शेतकऱ्यांना अर्थसाह्य नाही दिल्यास तसेच ओला दुष्काळ जाहीर नाही झाल्यास सीमावर्ती भागातील दापका येथे भव्य दिव्य सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन करण्यात येईल. या आंदोलनात काही नुकसान झाल्यास त्याला संपूर्ण शासकीय यंत्रणा जबाबदार राहील.
अशी नोंद सदरील रस्ता रोको साठी दिलेल्या निवेदनात उल्लेख करण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, त्यादृष्टीने कर्नाटक सरकारने काम करावे. अशीही आग्रही मागणी सदरील निवेदनात करण्यात आलेली आहे. याप्रसंगी ग्रामपंचायतचे सरपंच परशुराम डांगे, देवराज पाटील, संजय मुर्के, शुभम पाटील, किशनराव पाटील, संतोष राठोड, संग्राम गायकवाड, पंढरी मेत्री, चंद्रकांत भोसले, नागनाथ गायकवाड यांच्यासह दापका परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.