स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने “अन्न सुरक्षा सप्ताह” चे आयोजन
लातूर (प्रतिनिधी) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त दि. 5 ते 12 ऑगष्ट या दरम्यान “सुरक्षित आहार, आरोग्याचा आधार” हे घोषवाक्य घेवून अन्न व औषध प्रशासन लातूर यांच्या कडून अन्न सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करुन जनजागृती करण्यात येणार आहे. अन्न सुरक्षा सप्ताहा दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून त्याद्वारे लातूर जिल्ह्यातील अन्न व्यावसायिक, अन्न पदार्थ हाताळणारे व्यक्ति, गृहिणी यांचेसाठी कार्यक्रमाचे आयोजन करुन त्यांचे प्रबोधन केले जाईल अशी माहिती सहायक आयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन म.राज्य सु.वा.कुलकर्णी, यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
प्रत्येकाच्या घरात दररोज स्वयंपाक बनतो. साखर, मीठ, खाद्यतेल इत्यादींचा वापरही जवळपास प्रत्येक अन्न पदार्थात होतो. याच घटकांचा मोजका वापर करण्याबाबत पोस्टर्स, भित्तीपत्रके व कार्यशाळेच्या माध्यमातून जनमानसांचे विशेषत: गृहिणींचे प्रबोधन करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन लातूर हे कार्यालय अन्न सुरक्षा सप्ताहानिमीत्ताने कार्यरत राहणार आहे.
सुरक्षित अन्न उत्पादनासाठी / विक्रीसाठी अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 मधील तरतुदीमध्ये नमूद मुलभूत अत्यावश्यक स्वच्छता व आरोग्य इत्यादी संदर्भात काही निर्देशांचे पालन करणे आवश्यक आहे. त्यानुषंगे अन्न व्यावसायिक तसेच अन्न पदार्थ हाताळणारे व्यक्ती यांच्या प्रशिक्षणाचा कार्यक्रम दि. 8 ऑगस्ट 2022 वार सोमवार रोजी हॉटेल ब्रीज, शिवाजी चौक लातूर येथे आयोजित करण्यात आला असून अन्न सुरक्षा सप्ताहात यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
अन्न सुरक्षा सप्ताहा दरम्यान अन्न सुरक्षेचे नियम, जीवनातील गरज, त्यानुसार घ्यावयाची काळजी, आवश्यक उपाययोजना, शालेय विद्यार्थ्यांना पुरवावयाचा पोषक आहार, प्रशिक्षण तसेच मार्गदर्शन यासाठी विद्यार्थ्यांची प्रभातफ़ेरी, रॅली, कार्यशाळा इत्यादीमार्फ़त मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच या कालावधीत विनापरवाना अन्न व्यावसायिकांना विनाविलंब अन्न परवाने व नोंदणी देण्यासाठी विशेष मोहिमेचे नियोजन करण्यात येत आहे. तरी नागरिकांनी दि.5 ते 12 ऑगष्ट या कालावधीतील अन्न सुरक्षा सप्ताहात मोठया प्रमाणात हजेरी लावून सहभाग नोंदवावा असे आवाहन सहायक आयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन म.राज्य सु.वा.कुलकर्णी, यांनी केले आहे.