कार्यालयीन कामकाजाच्या गतिमानतेसाठी कर्मचाऱ्यांनी कार्यक्षमता विकसित करावी – डॉ. विठ्ठल मोरे

कार्यालयीन कामकाजाच्या गतिमानतेसाठी कर्मचाऱ्यांनी कार्यक्षमता विकसित करावी - डॉ. विठ्ठल मोरे

अहमदपूर (गोविंद काळे) : उच्च शिक्षण क्षेत्रातील महाविद्यालय हा एक महत्त्वाचा घटक असून, महाविद्यालयीन प्रशासनात कार्यालयाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. नव्या युगाची आव्हाने पेलण्यासाठी कार्यालयात गतिमानता आली पाहिजे आणि अशी गतिमानता आणण्यासाठी कर्मचाऱ्यांनी आपली कार्यक्षमता वाढवली पाहिजे, असे प्रतिपादन नांदेड येथील उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. वि.रा. मोरे यांनी केले.

येथील महात्मा फुले महाविद्यालयाचा कार्यालय विभाग आणि नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ‘ उच्च शिक्षण क्षेत्राच्या कार्यालयीन कामकाजातील सुलभीकरण’ या विषयावरील एक दिवसीय राष्ट्रीय ऑनलाईन कार्यशाळेत सहसंचालक डॉ. मोरे हे उद्घाटक म्हणून बोलत होते. या चर्चासत्राचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी भूषविले. तर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव ज्ञानदेव झोडगे गुरुजी तसेच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे उपस्थित होते.

या चर्चासत्राच्या दुसऱ्या सत्राचे अध्यक्षस्थान परभणी येथील अप्पर कोषागार अधिकारी नीळकंठ पाचंगे यांनी भूषविले तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून नांदेड येथील सहसंचालक कार्यालयातील अधिक्षक शंकर बर्गे यांनी मार्गदर्शन केले. कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तिका कशा लिहाव्यात तसेच कार्यालयातील अभिलेखांचे व्यवस्थापन कसे करावे याबाबत शंकर बर्गे यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोपात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील म्हणाले की, नव्या शैक्षणिक धोरणात प्रचलित शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल होणार असून, त्यासाठी कार्यालयीन कर्मचाऱ्यांचे वेळोवेळी प्रशिक्षण होणे आवश्यक आहे असेही ते म्हणाले.

या चर्चासत्राचे प्रास्ताविक संयोजक प्रशांत डोंगळीकर यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. मारोती कसाब यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. अनिल मुंढे यांनी केले. चर्चासत्राच्या यशस्वीतेसाठी अजय मुरमुरे, चंद्रकांत धुमाळे यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले. या चर्चासत्रात विविध महाविद्यालयातील कार्यालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author