आम्हाला स्वातंत्र्य मिळणार कधी ? आक्रोश मोर्चात तृतीयपंथीयांनी मांडला समस्यांचा पाढा

आम्हाला स्वातंत्र्य मिळणार कधी ? आक्रोश मोर्चात तृतीयपंथीयांनी मांडला समस्यांचा पाढा

उदगीर (प्रतिनिधी) : आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने सर्वत्र आनंदात सुवर्ण महोत्सव साजरा केला जात आहे. पण स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही तृतीयपंथीयांना त्यांचे हक्क आणि अधिकार मिळाले नाहीत. अजूनही त्यांना माणूस म्हणून समाजाने मान्यता दिली नाही. त्यांच्या वाट्याला सतत अपमानाचीच वागणूक येते. त्यांना राहण्यासाठी कोणी घरही देत नाही. हर घर तिरंगा या अभियानात त्यांना सहभागी व्हायचंय… त्यांच्याकडे झेंडे आहेत… पण झेंडा लावायला स्वतःचे घर नाही. अनंत अडचणींशी ते सामना करत जगत आहेत. शासनाकडे वारंवार त्यांनी विविध मागण्यांचे निवेदन दिले आहे. पण त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत.
एकीकडे स्वतंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आनंदोत्सव केला जातोय पण दुसरीकडे तृतीयपंथीयांना दुःखाशी सामना करावा लागत असल्यामुळे सांगा आमच्या हक्काचा वाटा कुठं हाय रं? असा प्रश्न त्यांनी व्यवस्थेला विचारला आहे. परवा त्यांना राशनकार्ड वाटप करण्यात आले. पण त्यांना राशनचा लाभ घेता आला नाही. स्वस्त धान्य दुकान बंद असल्याचे सांगण्यात येते. घरकुल मिळाले पाहिजे, स्वतंत्र स्मशानभूमी मिळाली पाहिजे, शासकीय नोकरीत आरक्षण मिळाले पाहिजे, राजकीय आरक्षण मिळाले पाहिजे या त्यांच्या मुख्य मागण्या आहेत.
या मागण्यासंदर्भात काल भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व तृतीयपंथीयांच्या गुरू माया पटेल व अंजली पटेल यांनी केले. ये आझादी झुठी है, आमच्या मागण्या मान्य करा, तृतीयपंथीयांचे हक्क अधिकार मिळालेच पाहिजेत, तृतीयपंथीयांना सन्मान मिळालाच पाहिजे अशा अनेक घोषणांद्वारे तृतीयपंथी यांनी त्यांचे प्रश्न समाजासमोर मांडले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून या मोर्चाची सुरुवात करण्यात आली. कॅप्टन कृष्णकांत चौक, नाईक चौक ते तहसील कार्यालयात ( आयटीआय) येऊन तृतीयपंथीयांनी तहसीलदार रामेश्वर गोरे यांना निवेदन दिले.
या आक्रोश मोर्चासाठी माया पटेल, वैष्णवी पटेल, रूपा पटेल, गौरी पटेल, सपना पटेल, रवीना पटेल, गायत्री पटेल, आलिया पटेल, पिंका पटेल, पूजा पटेल यांच्यासह उदगीर व परिसरातील तृतीयपंथी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


       गेल्या चार-पाच वर्षापासून आधार सेवा प्रतिष्ठान या संस्थेमार्फत आम्ही तृतीयपंथीयांच्या विविध मागण्यासाठी शासनाकडे निवेदने देत आहोत. पण आजपर्यंत शासनाकडून कोणत्याही निवेदनाची पूर्तता करण्यात आली नाही. तृतीयपंथी हे एक समाजाचे घटक आहेत. ते आपल्या देशाचे नागरिक आहेत. सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे त्यांनाही त्यांचे हक्क दिले पाहिजेत. पण शासनाने व राजकारण्यांनी त्यांना दुर्लक्षित ठेवले आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त तरी तृतीयपंथीयांना त्यांचे हक्क आणि अधिकार मिळाले पाहिजे हीच अपेक्षा. 
                       - भरतकुमार गायकवाड,
                          सचिव,
                 आधार सेवा प्रतिष्ठान, उदगीर.

          पुरुष आणि स्त्रियांप्रमाणेच तृतीयपंथीयांनाही योग्य न्याय, योग्य वागणूक मिळाली पाहिजे. पण समाजाकडून सतत मिळणाऱ्या हिनपणाच्या वागणुकीमुळे आम्ही कंटाळलोय. शासन दरबारी आम्ही न्याय मागायला गेलो तर आम्हाला थांबूही देत नाहीत. त्यामुळेच आम्हाला मोर्चे, आंदोलने करण्याची वेळ आली आहे. शासनाने आमच्या मागण्यांचा गांभीर्याने आता विचार करायला हवा. आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही उपोषणाला बसणार आहोत. 
                    - अंजली पटेल,
                   तृतीयपंथीयांच्या गुरु,उदगीर

About The Author