छंद जोपासण्यासाठी घ्यावे आभाळ कवेत – प्रकाश घादगिने

छंद जोपासण्यासाठी घ्यावे आभाळ कवेत - प्रकाश घादगिने

उदगीर प्रतिनिधी : रोजच्या जगण्यात विविध प्रसंगाशी जो झगडा खेळावा लागतो, त्याचा विसर पडणे हा छंदा मागचा उद्देश असतो. याच प्रयोजनाने आपला छंद जोपासण्यासाठी लिहिलेल्या कवितांचा संग्रह म्हणजेच ‘घ्यावे आभाळ कवेत’ होय. असे मत प्रसिद्ध व्यंगचित्रकार तथा साहित्यिक प्रकाश घादगिने यांनी व्यक्त केले.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या सुमंगल दिनी चला कवितेच्या बनात आयोजित व अश्विनी निवर्गी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या 271 व्या वाचक संवाद मध्ये प्रकाश घादगिने, लातूर यांनी प्रकाश काळे लिखित घ्यावे आभाळ कवेत या साहित्यकृतीवर संवाद साधताना पुढे म्हणाले की, कवीला कविता लिहिण्यात आनंद मिळतो. यासाठी प्रत्येक कवी आपला दैनंदिन व्यवसाय सांभाळून कवितेकडे वळतो, आणि स्वानंद सुखाच्या जगात स्वतःचे विवेचन करतो.
रोजचे जगणे आणि लिहिणे हे विविध ऋतू , शेती आणि समाज नात्याच्या संबंधातून कवितेची निर्मिती होते. मनातील सुप्त भावना व कल्पनांना शब्दात गुंफताना सभोवताली घडणाऱ्या घटना, येणारे बरे वाईट अनुभव, भेटणाऱ्या व्यक्ती, त्यांच्या प्रवृत्ती आदींच्या प्रभावातून प्रकाश काळे यांच्या कवितांची निर्मिती झालीआहे. हे सांगताना प्रकाश काळे यांचा जीवन प्रवास उकलताना त्यांचे अभ्यास पूर्वक लेखन मांडत त्यांच्या ‘नित्य मज वाटे दंग व्हावे मृदंगात, घ्यावे आभाळ कवेत अभंगाच्या दर्शनात’ अशा कविताही सादर केल्या.
अध्यक्षीय समारोपात अश्विनी निवर्गी म्हणाल्या की, कवी प्रकाश काळे अणि कविता यांची सुंदर उकल प्रकाश घादगिने यांनी केली आहे. कार्यक्रमाचे संचलन बालाजी सुवर्णकार यांनी तर संवादकांचा परिचय हनुमंत म्हैत्रे यांनी करुन दिला व आभार आनंद बिरादार यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी संयोजक अनंत कदम, राजेंद्र एकंबेकर, भागवत जाधव, राजपाल पाटील, बाबुराव सोमवंशी, तुकाराम धुमाळे, अंतेश्वर चालवा, आदींनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमास पत्रकार रामविलास नावंदर , रजनी पाटील, मंगला शेट्टी, कांता कलबुर्गे, डॉ. ईश्वर शेरे, जमालपुरे गुरुनाथ, अ‍ॅड. शिवाजी कोकणे, घोडके संभाजी, शिवाजी खादीवाले, शिवशंकर बडीहवेली आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

About The Author