विश्वरत्नाच्या उंचीचे अण्णा भाऊ – प्रा.शिवाजीराव देवनाळे
उदगीर (एल. पी. उगिले) : वाटेगाव वारणा खोऱ्यात जन्मलेल्या अण्णा भाऊने आपल्या महान लेखनिने मराठी साहीत्याला जागतिक दर्जा मिळवून दिला. त्यांच्या लेखणीची उंची पाहता अशा प्रज्ञावंत ज्ञानपीठाच्या राजास केंद्र आणि राज्य सरकारने भारत रत्न आणि महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करणे सन्मानाचे होते. त्यांचे साहित्य फक्त भारत रत्नाच्या उंचीचे नाही तर ते विश्वरत्नाच्या उंचीचे आहे.
त्याचा भारतीयाना गौरव आहे. असे गौरवपुर्ण उद्गार फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक प्रा. शिवाजीराव देवनाळे यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या १०२ व्या जयंती निमित्त काढले.
मौजे गुंडोपंत दापका ता. मुखेड येथे झालेल्या अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती दिनी आमदार डॉ. तुषार राठोड यांच्या हस्ते अण्णा भाऊच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमांची सुरुवात झाली. अध्यक्ष म्हणून व्यंकटराव पाटील दापकेकर हे होते तर प्रमुख मान्यवर वक्ता प्रा सुशीलप्रकाश चिमोरे, प्रा संजय बीबीनवरे उपस्थित होते.
पुढे बोलताना प्रा. देवनाळे म्हणाले अठरा विश्व दारिद्र्यात् शिक्षणाची कोणतीच साधन उपलब्ध नसल्यामुळे अण्णाभाऊंना ना शाळा पाहता आली, ना कॉलेज, ना विद्यापीठ मात्र आज त्यांचे साहित्य शाळेपासून ते विद्यापीठ स्तरावर अभ्यासले जाते. याचा बोध आम्ही घेणार कि नाही? केवळ एक दिवस जयंती करून अण्णा भाऊ समजणार नाहीत. त्याच्या साहित्याची उंची हिमालया एवढी तर खोली महासागराची आहे.
राष्ट्रभक्ती आणि लोकभक्ति हा भाऊच्या साहित्याचा आत्मा आहे. ज्यांना इतिहास घडवायचा आहे, त्यांनी अण्णाभाऊच्या कार्य कृतात्वाचा इतिहास वाचावा. असे हि ते म्हणाले.
यावेळी प्रा.सुशीलप्रकाश चिमोरे आणि संजय बीबीनवरे यांचे हि मौलिक भाषणे झाली. या कार्यक्रमास डॉ. बालाजी झटकुडे, ज्ञानोबा पाटील, गणेश पाटील, तुलसीराम कांबळे, अरन्य महाराज,बालाजी रानकूटवार, यशपाल दपकेकर, बालाजी घोडके, अरुण पाटील, तुकाराम घुमडे, विशाल घूमडे, या सह जण समुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता.