महाराणी अहिल्यादेवी तत्त्वज्ञानी राज्यकार्त्या होत्या – डॉ. बब्रुवान मोरे
अहमदपूर (गोविंद काळे) : महाराणी अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या राज्यात प्रजेच्या हितासाठी अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले. आपल्या राज्यात त्यांनी रस्ते, बाजारपेठा विकसित केल्या. गोरगरीब बहुजनांसाठी निवासस्थाने, भोजन गृहे बांधली. नद्यांच्या काठावर घाट बांधले. शिव मंदिरांचा जीर्णोद्धार केला. त्याचबरोबर मूलभूत सुविधा लोकांना पुरवून एका तत्त्वज्ञानी राज्यकारभाराचा नवा आदर्श निर्माण केला, असे मत इतिहासाचे गाढे अभ्यासक, इतिहास तथा सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. बब्रुवान मोरे यांनी केले.
येथील महात्मा फुले महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभागाच्या वतीने महाराणी लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन सभेत प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे होते. तर, समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सतीश ससाणे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांना स्मृतिदिनानिमित्त पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपा प्रसंगी प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन व कार्यावर प्रकाश टाकला व महाराणी अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा आदर्श सर्वांनी घ्यावा असे आवाहन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.पांडुरंग चिलगर यांनी केले तर आभार डॉ. मारोती कसाब यांनी मानले. यावेळी प्रो. डॉ. अभिजीत मोरे, डॉ. प्रशांत बिरादार, प्रा.अतिश आकडे, डॉ. संतोष पाटील यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.
