स्पर्धेचे आव्हान स्वीकारूनच जीवनात यशस्वी होता येते – उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी

स्पर्धेचे आव्हान स्वीकारूनच जीवनात यशस्वी होता येते - उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी

अहमदपूर (गोविंद काळे) : सध्याचे युग स्पर्धात्मक आहे त्यात यश प्राप्त करण्यासाठी योग्य नियोजन, अभ्यासातील सातत्य आणि त्याची योग्य अंमलबजावणी केली तर, कोणतेही यश अशक्य नाही. कारण आपण स्पर्धेचे आव्हान स्वीकारले तरच जीवनात यशस्वी होऊ शकतो, असे स्पष्ट प्रतिपादन अहमदपूरचे उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी यांनी केले.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, ते महात्मा फुले महाविद्यालय अहमदपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या पदवीदान कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे होते तर विचार मंचावर उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी यांच्यासह महाविद्यालय विकास समितीचे सदस्य डॉ. सतीश ससाणे, प्रो. डॉ. अनिल मुंढे, डॉ. बब्रुवान मोरे, प्रशांत डोंगळीकर यांच्यासह कार्यक्रमाचे संयोजक प्रो. डॉ. अभिजीत मोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना प्रवीण फुलारी म्हणाले की, सर्वांग सुंदर जीवन जगण्याची कला म्हणजे शिक्षण आहे. शिक्षण माणसाला माणूस बनवतो आणि जीवनातील कठीण प्रसंगाला कसे सामोरे जायचे याचं उत्तर शिक्षणातूनच माणसाला मिळतं. तरी, विद्यार्थ्यांनी आपल्या पदवीचा उपयोग योग्य त्या पद्धतीने करावा असे ही ते म्हणाले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारंभाप्रसंगी प्राचार्य डॉ.वसंत बिरादार पाटील म्हणाले की, शिक्षण पूर्ण केल्यावर व्यक्तिमत्व सुसंस्कारित होते. या सुसंस्कारित व्यक्तिमत्त्वाचा उपयोग राष्ट्राला आणि समाजाला व्हावा हे ध्येय पदवी प्राप्त विद्यार्थ्यांनी अंगी बाळगावे तरच आपल्या पदवीचा खऱ्या अर्थाने राष्ट्राला आणि समाजाला उपयोग होईल. तसेच पुढे बोलताना म्हणाले की, या पदवी बरोबरच आपण व्यवसायाभिमूख व समाजोपयोगी शिक्षण ही मिळवावे. शिक्षण हे वाघिणीचे दूध तर आहेच त्याचबरोबर शिक्षण ही जादूची कांडी आहे, शिक्षणामुळेच आपले जीवनातील स्वप्न पूर्ण होतात. असेही ते म्हणाले. याप्रसंगी महाविद्यालयाने प्रकाशित केलेल्या ‘आसूड’ या वार्षिक अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच, पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्राचे वितरण ही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक परीक्षा विभाग प्रमुख तथा क्रीडा संचालक प्रो. डॉ.अभिजीत मोरे यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ.मारोती कसाब यांनी व आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. पांडुरंग चिलगर यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी, पदवीप्राप्त विद्यार्थी, पालक तसेच महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी -विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!