कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासकीय मंडळ आणण्यासाठी हालचाली सुरू
उदगीर (एल.पी.उगिले) : उदगीर कृषी उत्पन्न बाजार समिती मराठवाड्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील एक आदर्श बाजार समिती म्हणून कार्यरत आहे. काही मालाच्या बाबतीत लातूरपेक्षाही जास्त आवक या बाजारपेठेत आहे. ही बाजारपेठ सध्या काँग्रेस पक्षाच्या ताब्यात असून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती म्हणून सिद्धेश्वर उर्फ मुन्ना पाटील हे उत्कृष्ट कार्य करत आहेत.
शेतकरी, कष्टकरी, हमाल, मापाडी, व्यापारी या सर्वांच्या हिताच्या वेगवेगळ्या योजना प्रत्यक्ष राबवून, आपल्या कामाची झलक त्यांनी दाखवून दिली आहे.
असे असले तरीही महाराष्ट्र राज्यात सत्ता बदल झाल्यामुळे आणि उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीला मुदत संपली म्हणून वाढीव मुदत दिलेली आहे. ती वाढीव मुदत रद्द करावी, आणि प्रशासकीय मंडळ आणावे. जेणेकरून काँग्रेसचे सत्ता केंद्र आपल्या ताब्यात येईल.
अशा पद्धतीच्या हालचाली भारतीय जनता पक्षाचे नेते तथा माजी आमदार सुधाकरराव भालेराव यांनी सुरू केलेल्या आहेत. त्यांनी सचिन हुडे, जळकोट तालुक्यातील भाजपचे नेते धरमपाल देवशेट्टे यांना सोबत घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घालून देऊन बाजार समितीवर प्रशासकीय मंडळ आणावे. या दृष्टीने मागणी केल्याचे विश्वासनीय सूत्राकडून समजते.
बाजार समितीवर येणारे हे प्रशासकीय मंडळ न्यायालयीन प्रक्रियेनंतर टिकेल किंवा नाही? याबद्दल साशंकता असली तरीही चार दिवस का होत नाही, पण त्या खुर्चीवर बसावे. असे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटू लागले आहे. तसा हा कार्यकर्त्यांचा अट्टाहास असला तरी, खरा उद्देश काँग्रेसचे सत्ता स्थान आपल्या ताब्यात घ्यावे. हेच भाजपचे धोरण असल्याचे शहरात बोलले जात आहे. कारण अत्यंत व्यवस्थित आणि सुस्थितीत चालू असलेल्या बाजार समितीवर अचानक प्रशासक मंडळ आले तर म्हणावे त्या गतीने विकास होणे कठीण आहे.
तसेच या विकास कामाचा प्रत्यक्ष अनुभव असलेले किती संचालक असतील? हाही प्रश्नच आहे. तसेच विद्यमान सरकार मध्ये भारतीय जनता पक्ष सोबत मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या गटाचे अर्थात शिवसेनेचे किती संचालक घेतले जातील? हाही प्रश्नच आहे. कारण भारतीय जनता पक्षाशी सलगी करणारे शिवसेनेतील काही कार्यकर्ते जे प्रत्यक्षात शिंदे गटाच्या विरोधात आहेत. अशांच्याही नावांचा समावेश सदरील प्रशासकीय मंडळात असल्याचीही चर्चा चालू आहे. त्यामुळे या प्रशासकीय मंडळात नेमके कोणते शिवसैनिक असतील? या संदर्भातही तालुक्यात संभ्रम निर्माण झालेला आहे.
या अनुषंगाने शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे कार्यकर्ते शिवसेना माजी उपजिल्हाप्रमुख ॲड. गुलाबराव पटवारी यांनी स्पष्ट केले आहे की, भारतीय जनता पक्षासोबत आमच्या गटाचे सरकार असून आमच्या गटातील कार्यकर्त्यांचा समावेश प्रशासकीय मंडळात असणार आहे. अद्याप दोन-चार नावे सोडली तर इतर नावांचा उल्लेख किंवा चर्चा झालेली नसतानाच प्रशासकीय मंडळाच्या बाबत निर्माण होणारा वाद विचारात घेतल्यास, प्रशासकीय मंडळ येण्याची जी चर्चा आहे. ती हवेतच तर विरणार नाही ना? अशीही शंका काही जाणकार राजकारणी घेत आहेत.
तर काहींच्या मते येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विचारात घेऊन भारतीय जनता पक्ष बाजार समिती सारखा सत्ता केंद्राचा भाग आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करेल, असेही बोलले जात आहे. काही असले तरी उदगीरकरांच्या आणि शेतकरी, व्यापारी, हमाल, मापाडी त्यांच्या हिताचा विचार करणारे प्रशासकीय मंडळ असावे. अन्यथा सध्या जे चालू आहे, ते उत्कृष्ट आहे.
विकासात्मक वाटचाल त्यांची चालू आहे. याची गांभीर्याने नोंद घेऊन प्रशासक मंडळ टाळावे. या दृष्टीनेही हालचाली होत असल्याचे समजते.
