शिवाजी महाविद्यालयातर्फे विविध गावात वृक्षारोपण व श्रमदान
उदगीर (एल.पी.उगीले) : पर्यावरण संतुलनासाठी वृक्षारोपणाची गरज ओळखून उदगीर येथील शिवाजी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने वृक्ष दान-दत्तक अभियान सुरू करण्यात आले आहे. त्याअंतर्गत आजपर्यंत जवळपास 2000 वृक्ष संकलित करण्यात आले असून पैकी आजपर्यंत 150 वृक्षाची संगोपनासाठी दत्तक देऊन लागवड करण्यात आली आहे. अमृत महोत्सवाचे औचित्य साधून हैबतपुर, दावनगाव व तोंडचिर या ठिकाणी आंबा 25, सिल्वर 25, नांदूरगी 20, बेल 5, जांब 10, लिंबू 5, चिकू 5 व मोगरा 5 अशा एकूण 100 वृक्षाची लागवड करण्यात आली. या गावातील शाळा, ग्रामपंचायात व ग्रामस्थच्या घरी वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी दावनगावचे संत सावंत माळी विद्यालय, आरोग्य उपकेंद्र, तोंडचिरचे जिजामाता विद्यालय, जिल्हा परिषद शाळा इत्यादी ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. तिन्ही गावचे सरपंच व ग्रामस्थ याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर सुट्टीचे औचित्य साधून बामणी या ठिकाणी स्वयंसेवक व मुख्य कार्यक्रमाधिकारी डॉ. एस. व्ही. शिंदे व वृक्ष दान दत्तक अभियानाचे संयोजक प्रा.बालाजी सूर्यवंशी यांनी हनुमान मंदिर परिसरात श्रमदान केले.या कामी अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. एल.एच. पाटील व कार्यक्रमाधिकारी डॉ.के. डब्ल्यू. गुट्टे तसेच स्वयंसेवक व स्वयंसेविकांचे सहकार्य लाभले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनायकराव जाधव, उपप्राचार्य डॉ. आर.एम. मांजरे तसेच डॉ. एस. व्ही.जगताप, प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी वृक्षदान देऊन सहकार्य केले.किसान शिक्षण प्रसारक मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या कार्याचे कौतुक केले.
