शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज घेऊन शेतीची कामे करावी – पंजाबराव डख

शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज घेऊन शेतीची कामे करावी - पंजाबराव डख

उदगीर (एल. पी. उगिले) : शेतीच्या कामासाठी हवामानाचा अंदाज अत्यंत महत्त्वाचा असतो. विशेष करून पावसाचा अंदाज महत्त्वाचा आहे, पेरणी कधी करावी? पेरणीनंतर इतर मशागतीची कामे कधी करावी, कशी करावी? या अनुषंगाने शेतकऱ्यांशी सुसंवाद साधण्यासाठी हवामान तज्ञ पंजाबराव डख हे उदगीर येथे उपस्थित होते.
उदगीर येथील सहकार महर्षी चंद्रकांतअण्णा वैजापूरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून उदगीर येथील रघुकुल मंगल कार्यालयात त्यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उदगीरचे आमदार माजी गृहराज्यमंत्री तथा आमदार संजय बनसोडे हे होते. तर, प्रमुख उपस्थित माजी आमदार तथा भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष गोविंदराव केंद्रे, उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सिद्धेश्वर उर्फ मुन्ना पाटील, उपसभापती रामराव बिरादार येनकीकर, ओमप्रकाश झुरूळे, सरपंच राजकुमार बिराजदार, दत्ताभाऊ खंकरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना माजी गृहराज्यमंत्री आमदार संजय बनसोडे यांनी स्पष्ट केले की, खरीप हंगाम मध्ये दुर्दैवाने अतिवृष्टी झाल्याने सर्व शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
त्यात भारीस भर गोगलगाय सारख्या उपद्रवी कीटकांनी पिकांचे नुकसान केले आहे. अशा परिस्थितीत शेतकरी हातबल झाला आहे. तरीही उपलब्ध असलेल्या पिकाच्या रक्षणासाठी हवामानाचा अंदाज घेऊन योग्य ती उपाययोजना करावी, जेणेकरून किमान उत्पादन खर्च तरी हाती लागेल. असा हेतू ठेवून सामाजिक कार्यकर्ते तथा सहकार महर्षी चंद्रकांतअण्णा वैजापूरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून खास शेतकऱ्यांच्या प्रबोधनासाठी व मार्गदर्शनासाठी हवामान तज्ञ पंजाबराव डक यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी ही माहिती त्यांनी याप्रसंगी दिली.
तसेच शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून न निघणारे आहे. त्यासाठी शासकीय पातळीवरून शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत, अशी ही माहिती त्यांनी याप्रसंगी दिली.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकपर भाषणातून संयोजक राजकुमार बिराजदार यांनी सहकार महर्षी चंद्रकांतअण्णा वैजापूरे हे समाजसेवक असल्यामुळे त्यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमानेच साजरा झाला पाहिजे. हा आदर्श दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून सामाजिक जनजागृती साठी प्रवचनाचे आयोजन करून सामाजिक आणि अध्यात्मिक समन्वय साधण्याचा प्रयत्न करण्यात आला.

तसेच तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या हितासाठी हवामान तज्ञ पंजाबराव डख यांच्या मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आल्याचेही त्यांनी याप्रसंगी स्पष्ट केले. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने सरपंच, विविध गावातील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन, संचालक, शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सिद्धेश्वर उर्फ मुन्ना पाटील यांनीही मार्गदर्शन करून, बाजार समिती या शेतकऱ्यांसाठी सहकार्य करणाऱ्या संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनाची माहिती सर्वांना दिली. तसेच वेगवेगळ्या राबवण्यात येणाऱ्या, आणि संभाव्य योजनांचीही माहिती त्यांनी याप्रसंगी लोकांना दिली. कार्यक्रमाचे आभार आणि सूत्रसंचालन सहकार महर्षी चंद्रकांतअण्णा वैजापूर प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी केले.

About The Author

error: Content is protected !!