शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये द्या – कृषिमंत्र्याकडे आ.बनसोडे यांची मागणी
उदगीर (एल. पी. उगिले) : लातूर जिल्ह्यातील अतिवृष्टी व शंखी गोगलगायीमुळे झालेल्या पीक नुकसानीचे शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 50 हजार रुपयांचे नुकसान भरपाई द्यावी. अशी मागणी करणारे निवेदन उदगीरचे आमदार संजय बनसोडे यांनी महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना दिले आहे.
अतिवृष्टी आणि शंखी गोगलगाय, मोझैक विषाणू यामुळे पिकांचे झालेले नुकसान याची पाहणी करण्यासाठी कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे लातूर दौऱ्यावर आले होते. याप्रसंगी उदगीर विधानसभा मतदारसंघाचे आ. संजय बनसोडे यांनी निवेदन दिले. सदरील निवेदनात उदगीर व जळकोट तालुक्यातील अतिवृष्टीने खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत पंचनामा आणि पाहणीचे नाट्य न करता सरसकट हेक्टरी 50 हजार रुपयांचे नुकसान शेतकऱ्यांना द्यावे. जेणेकरून शेतकरी पुन्हा उभा राहू शकेल, अन्यथा संपूर्ण खरीप हंगामच शेतकऱ्यांच्या हातून गेला असल्याने शेतकरी हातबल झाला आहे.
शेतकऱ्यांचे झालेले अतोनात नुकसान न भरून येणारे आहे. नगदी पिके शेतकऱ्यांच्या हातून गेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देणे शासनाचे नैतिक कर्तव्य आहे. या गोष्टीची जाणीव ठेवून, शासनाने तात्काळ मदत करावी. असेही आवाहन सदरील निवेदनात आ. संजय बनसोडे यांनी केले आहे. शेतकऱ्यांना वेळीच अर्थ साह्य नाही दिल्यास ही बाब शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक ठरणार आहे याही गोष्टीचे गांभीर्य शासनाने विचारात घ्यावी, शेतकऱ्यांना आर्थिक स्वावलंबी बनवावे या दृष्टीने नियोजन होणे अत्यंत गरजेचे आहे. जेणेकरून शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखता येतील, याही गोष्टीचे गांभीर्य शासनाने विचारात घ्यावे. असेही आ संजय बनसोडे यांनी स्पष्ट केले आहे.
