शहरातील काही दुकाने रात्री बारा वाजेपर्यंत चालू; कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा !
उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर येथील बाजार रात्री साडेदहा नंतर, जास्तीत जास्त अकरानंतर बंद व्हावा. जेणेकरून कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. असे असताना देखील काही दुकाने रात्री बारानंतर ही चालू राहत आहेत,या ठराविक दुकानांना कांहीं वेगळा परवाना आहे की काय?असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे.
अशा घटना मुळे कायदा व सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले, म्हटले तर वावगे होऊ नये. मोजक्याच दुकानामुळे रात्री अकराच्या नंतर अनेक टुकार मुले अशा दुकान, हॉटेल वर जमतात. काही दारूची दुकाने अर्थात परमिट रूम आणि बियर बार तर रात्रभर चालू असतात अशीही ओरड आहे, त्यामुळे दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे.
सध्या उदगीरचा विकास होत असल्यामुळे उदगीर शहराहून जाणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये वाढ झाली आहे. काही गाड्या रात्री अकरा, साडे अकरा, बारा वाजता उदगीरला येतात. अशा गाड्यातून येणाऱ्या प्रवाशांना ही टुकार मुले चक्क लुबाडतात. परवाच एका प्रतिष्ठित व्यापाऱ्याचे पैसे, मोबाईल आणि दागिने काढून घेऊन पोलिसात जर तक्रार केलास तर ठीक होणार नाही. अशी धमकी दिल्यामुळे त्या व्यापाऱ्याने रीतसर तक्रार जरी दिली नसली तरी या घटनेच्या संदर्भात पोलीस प्रशासनातील अधिकारी वर्गाला संपर्क करून सविस्तर माहिती दिली आहे. असे असून देखील पोलीस प्रशासनाकडून कसलाही फरक जाणवला नाही, किंवा रात्रीची गस्तही वाढली नाही.
कित्येक जणांना पोलिसाकडे जाणे म्हणजे “भीक नको, कुत्रा आवर” असे वाटायला लागू लागले आहे. त्यामुळे अशा भामट्या कडून जरी लुबाडले गेले तरी, झाले ते झाले. आता पुन्हा पोलिसात जाऊन तरी काय फायदा? उलट पोलीस आपलीच अनावश्यक चौकशी करत बसतात. ते टाळण्यासाठी बहुधा अनेक जण तक्रार ही करत नाहीत. रेल्वे स्टेशनचा परिसर तसेच उमा चौक, नळेगाव रोडवरील उड्डाणपूल या भागाला या टुकार मुलांनी आपला अड्डा बनवला आहे.
नगरपालिकेचे माजी मुख्याधिकारी भारत राठोड यांनी नळेगाव रोडवरील उड्डाणपुलाखाली अशा टुकार मुलांची बैठक वाढल्यामुळे त्या ठिकाणी स्वच्छता करून योगा केंद्र बनवले होते. मात्र आता पुन्हा “येरे माझ्या मागल्या….” म्हणतात, त्याप्रमाणे पुन्हा त्या ठिकाणी तळीरामांची बैठक सुरू झाली आहे.
या सर्व गोष्टी पोलीस प्रशासनाला माहिती असून देखील का कारवाई केली जात नाही? याबाबत सर्वसामान्य माणसांमध्ये उलट सुलट चर्चा चालू आहे. रात्रीच्या वेळी जेव्हा रेल्वे उशिराने येते, त्यावेळी रिक्षा जर नाही मिळाला तर जीव मुठीत धरून घर गाठणे, अशी परिस्थिती प्रवाशाची झालेली आहे. त्यामुळे रेल्वे पोलीस आणि उदगीर शहर व ग्रामीण पोलीस यांनी आपापल्या हद्दीत रात्रीच्या वेळी गस्त वाढवावी. अशी मागणी या भागातील नागरिक करत आहेत.
