दांडी बहाद्दर कर्मचाऱ्यांमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान
कमालनगर (प्रतिनिधी) : सीमावर्ती भागातील उदगीर लगत असलेल्या तालुक्यातील अनेक शाळांमध्ये खास करून मराठी भाषिक शाळेत सीमावर्ती भागातील शिक्षक व कर्मचारी वेळेवर शाळेत येत नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
कमालनगर तालुक्यातील विशेष करून दापका परिसरातील शाळेत असा प्रकार होत असल्याचा आरोप आहे.नंदीबिजलगाव प्राथमिक शाळेतील कर्मचाऱ्यांची सतत गैरहजेरी विद्यार्थ्यांच्या दृष्टीने धोक्याची ठरली आहे.
अगोदरच कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्ष शाळेपासून विद्यार्थी दूर राहिले आहेत, आणि आता नियमित शाळा सुरू झाल्या तर शिक्षकांची मनमानी चालू आहे. याच्यावर आळा कोण घालणार? असा प्रश्न चालू आहे. एका बाजूला शिक्षण समितीची नेमणूक करून शिक्षणाचा दर्जा वाढला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली जाते.
मात्र विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षकाकडूनच जर हलगर्जीपणा होत असेल तर, विद्यार्थी काय करणार? नंदीबिजलगाव या गावातील कर्मचाऱ्यांची संख्या सहा आहे. या शाळेत 180 विद्यार्थी पहिली ते आठवी वर्ग पर्यंत आहेत. या विद्यार्थ्यांना शिकवणारे शिक्षक दांडी बहाद्दर बनले आहेत.असा आरोप आहे. त्यांना शिक्षणाधिकारी आणि केंद्रप्रमुख यांनी धारेवर धरणे गरजेचे आहे. अशी मागणी शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने केली जाते आहे.
