सौराष्ट्र निधी बँक समाज उभारणीत सहकार्य करेल – चंदर अण्णा वैजापूरे

उदगीर (एल. पी. उगिले) : उदगीर येथे नव्याने सुरू होत असलेली सौराष्ट्र अर्बन निधी लिमिटेड या बँकेच्या मार्फत समाजातील सुशिक्षित बेकार, बेरोजगार युवकांना उद्योगधंद्यासाठी अर्थसहाय्य केले जाईल, आणि त्या माध्यमातून समाजाची उभारणी होईल. असा विश्वास सहकार महर्षी चंदर अण्णा वैजापूरे यांनी व्यक्त केला. ते सौराष्ट्र अर्बन निधी लिमिटेड या बँकेच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत होते. या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी उदगीर येथील श्रद्धास्थान श्रीहवगीस्वामी मठाचे मठाधीश श्री श्री श्री 108 शंभू लिंग शिवाचार्य महाराज हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार तथा भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष गोविंदराव केंद्रे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शेषेराव पाटील, जळकोटचे उपनगराध्यक्ष मनमथ आप्पा किडे, उपविभागीय अधिकारी मेंगशेट्टी, तहसीलदार रामेश्वर गोरे, सुप्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ तानाजी मोरे, इच्छापूर्ती कोचिंग क्लासेस चे मार्गदर्शक गुंडप्पा पटणे, सुप्रसिद्ध उद्योजक लक्ष्मीकांत स्वामी, बाबुराव समगे, सीए कल्याणी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
सर्वप्रथम बँकेचे संचालक प्रा. सिद्धेश्वर पटणे यांनी प्रास्ताविक पर भाषण केले, या प्रास्ताविक पर भाषणातून त्यांनी स्पष्ट केले की, सौराष्ट्र ही बँक सहकार महर्षी चंदर अण्णा वैजापूरे यांच्या आशीर्वादामुळे व चेतन भैया वैजापूरे यांच्या मार्गदर्शनाने व सहकार्यामुळेच स्थापन होऊ शकली. आम्हा सात लोकांना एकत्र करून तुम्ही हे काम करू शकता, असा आत्मविश्वास चेतन भैया वैजापूरे यांनी दिल्याने आमचा आत्मविश्वास वाढला. आणि त्या आत्मविश्वासातून ही बँक उभा राहिली.
आम्ही कोणीही ध्यानीमनी नसताना बँकेचे संचालक झालो. असे भावनिक उद्गार बोलून दाखवले. तसेच बँकेच्या स्थापनेमागे ना नफा ना तोटा या तत्त्वावर गरजूंना अर्थसहाय्य करणे व समाजाची उभारणी करण्यासाठी प्रयत्न करणे हा असल्याचे सांगितले, हे सांगताना सखोल मार्गदर्शन केले.
याप्रसंगी बँकेचे मार्गदर्शक चेतन वैजापूरे, बँकेचे संचालक ज्येष्ठविधीज्ञ तात्या पाटील, संचालक नीतीश हरकरे, संचालक विश्वनाथ बिरादार कोळखेडकर, संचालक अंकुश आठाने, सुरज वैजापूरे, बँकेचे व्यवस्थापक जोशी, ओंकार बिरादार, राजकुमार बिराजदार बामणीकर, बालाजी पाटील नेत्रगावकर, साईनाथ चिमेगावे, प्रा. नंदकुमार पटणे इत्यादींच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा फेटा बांधून शाल व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
त्यानंतर सहकार महर्षी चंदर अण्णा वैजापूर यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले. तर आतील कार्यालयाचे उद्घाटन शंभूलिंग शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. याप्रसंगी शंभूलिंग शिवाचार्य महाराज यांनी आशीर्वादाने दिले.
पुढे बोलताना सहकार महर्षी चंद्रकांत अण्णा वैजापूरे यांनी स्पष्ट केले की, ही बँक म्हणजे युवकांनी युवकांच्या विकासासाठी उभारलेला सामाजिक महायज्ञ आहे. समाजातून या बँकेसाठी सहकार्याचा हात पुढे यावा. जेणेकरून नवीन नवीन उद्योग धंदे उभारण्यासाठी युवकांना प्रोत्साहन मिळेल. असा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन या बँकेचे संचालक प्रा. सिद्धेश्वर पटणे यांनी केले. या उद्घाटन सोहळ्यासाठी उदगीर शहर व पंचक्रोशीतील शेकडो नागरिक उपस्थित होते.
