आगामी स्थानिक स्वराज्य संस्थात राष्ट्रवादी काँग्रेसच अग्रेसर राहील – सक्षणाताई सलगर
उदगीर (एल. पी. उगिले) : आगामी काळामध्ये येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रत्येक निवडणुकीत उदगीर विधानसभा मतदारसंघा इतकेच मर्यादित नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच अग्रेसर राहील. युवक कार्यकर्त्यांनी आणि युवती आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सक्रिय होऊन या भागामध्ये पक्षाने केलेले कार्य, माजी राज्यमंत्री आ. संजय बनसोडे यांनी केलेल्या मोठ्या विकास कामाची पावती जनता निश्चित देईल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणाताई सलगर यांनी व्यक्त केला.
त्या उदगीर येथे आपल्या दौऱ्या दरम्यान सहकार महर्षी चंदरअण्णा वैजापूरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते श्रीकांत पाटील यांच्या निवासस्थानी आयोजित कार्यकर्त्यांशी संबोधन कार्यक्रमात बोलत होत्या.
याप्रसंगी शेकापूर येथील विविध विकास कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब नवाडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष ॲड. दिपालीताई औटे, युवती आघाडीच्या ज्योतीताई स्वामी, महेश नवाडे, अजीम दायमी, बालाजी पाटील नेत्रगावकर, अजय शेटकर, संदीप देशमुख, अशोक कांबळे, दिलीप कांबळे, बबलू शेल्हाळकर, संतोष सूर्यवंशी, विजय रायवाडे, मलंग शेख इत्यादी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलताना सक्षणाताई सलगर म्हणाल्या की, महाराष्ट्रामध्ये लातूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून राज्यमंत्री आमदार संजय बनसोडे यांनी मोठा विकास निधी आणून विकास घडवून आणला आहे. कार्यकर्त्यांनी आपण केलेल्या विकासात्मक कामाची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवणे महत्त्वाचे आहे. प्रचार आणि प्रसाराच्या दृष्टीने कार्यकर्ता हा अत्यंत महत्त्वाचा दुवा असून हा दुवा जितका मजबूत असेल तितकी पक्षाला ताकद मिळते. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी येणाऱ्या काळात सर्वच निवडणुकांसाठी एक दिलाने काम करून आपला वेगळा ठसा उमटवून दाखवावा.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार साहेब यांचे 80 टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे धोरण, यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वधर्म समावेशक आणि लोककल्याणकारी भूमिकेचे निर्णय, जनतेपर्यंत पोहोचवा. राष्ट्रवादीची भूमिका तळागाळातील कार्यकर्त्यांच्या आणि जनतेच्या हिताची आहे. याची जाण करून द्या. सर्वसामान्य माणसापर्यंत शासकीय योजनांचा लाभ मिळाला पाहिजे, या दृष्टीने गोरगरिबांना विविध योजनांचा लाभ मिळवून द्या. कार्यकर्त्यांनी आपली भूमिका स्वयंसेवकाची ठेवावी. त्यामुळे जनतेमध्ये कार्यकर्त्याची लोकप्रियता निर्माण होते, आणि हीच लोकप्रियता निवडणुकीच्या दरम्यान कामाला येऊ शकते. असेही सक्षणाताई पाटील यांनी या प्रसंगी सांगितले.
