सायबर फ्रॉडपासून वाचण्यासाठी विद्यार्थ्यांनी सावधानता बाळगावी – सहाय्यक उप अधीक्षक निकेतन कदम
शिरूर ताजबंद (गोविंद काळे) : येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयात ते विद्यार्थ्यांशी संवाद साधताना बोलत होते. ‘आज प्रत्येक व्यक्ती ऑनलाईन व्यवहार करत असल्यामुळे ऑनलाईन पद्धतीचा वापर करून फसवणुकीचे व्यवहारही मोठ्याप्रमाणात वाढले आहेत. तसेच तरुण मुलांना फसविण्याचा नवीन प्रकार पुढे असला असून रेकॉर्डेड अश्लील व्हिडिओच्या वापरातून तरुणांना गळाला लावून पैशाच्या रूपात खंडणी वसूल करण्याचे अनेक प्रकार पुढे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. महाविद्यालयीन तरुणीच्या छेडछाडीचे प्रकार खूप वाढले असून ते थांबविण्यासाठी स्वतः मुलींनी पुढे यावे’, असेही ते यावेळी म्हणाले. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त ते ‘स्मार्ट पोलीस, जागरूक नागरिक’ याविषयावर बोलत होते. सामान्य नागरिक आणि पोलीस प्रशासन यांच्यातील आत्मीयतेने नाते निर्माण होण्याच्या दृष्टीने आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेबाबत मार्गदर्शन करण्याचे हेतूने वरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. माने होते तर मंचावर राष्ट्रीय कबड्डी खेळाडू उप निरीक्षक तुळशीदास रोकडे, नांदेड विद्यापीठाचे माजी क्रीडा संचालक तथा महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. भास्कर माने,, मुख्याध्यापक दीपक भराटे, उपप्राचार्य व्यंकट कीर्तने, डी.एड. चे प्राचार्य यादव कर्डिले आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रास्ताविक आणि अध्यक्षीय समारोप प्राचार्य डॉ. डी. जी. माने यांनी तर सूत्रसंचालन आणि आभार डॉ. गोविंद काळे यांनी व्यक्त केले. सदरील कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डॉ. भास्कर माने, डॉ. जीवन गंगणे, डॉ. नवनाथ पुरी, प्रा. एजाज पठाण, राजू कदम, नागेश सरवदे, बालू चित्तलवाड आदींनी परिश्रम घेतले. यावेळी महाविद्यालयाचे सर्व सहकारी, मोहनराव पाटील डी. एड. विद्यालयाचे सर्व सहकारी, तसेच विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
