वीट भट्ट्याच्या अतिक्रमणावर तहसीलचा हातोडा

वीट भट्ट्याच्या अतिक्रमणावर तहसीलचा हातोडा

उदगीर (एल. पी. उगिले) : उदगीर शहरातील अतिक्रमणाच्या संदर्भात वेगवेगळ्या प्रश्नावर आंदोलने सुरू असून जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, तहसीलदार रामेश्वर गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उदगीर तहसील कर्मचाऱ्यांनी उदगीर शहरालगत असलेल्या वीट भट्ट्याच्या अतिक्रमणावर हातोडा फिरवायला सुरुवात केली आहे.
उदगीर शहराच्या चहुबाजूनी शहरालगतच मोठ्या प्रमाणात वीटभट्ट्या असल्याने या वीटभट्ट्यातून निघणारा धूर हा विषारी आणि प्रदूषणाला घातक असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पहाटे आणि संध्याकाळच्या वेळी प्रसन्न वातावरण राहते म्हणून, वयोवृद्ध माणसे, खेळाडू हे शहराबाहेर फिरायला जातात. मात्र शहराबाहेर या वीट भट्ट्यांच्या धुरामुळे त्यांच्या आरोग्याला फायदा होण्याऐवजी नुकसानच होण्याची शक्यता जास्त असल्याने सदरील वीट भट्ट्या ज्या अतिक्रमण करून बसलेल्या आहेत, त्या वीटभट्ट्या हलविण्याचे काम उदगीर तहसीलचे मंडल अधिकारी शंकरराव जाधव, तलाठी पंकज कांबळे तसेच त्यांचे सहकारी अमोल रामशेट्टे, बाबासाहेब कांबळे, देवप्रिय पवार, महसूल सहाय्यक विशाल कदम हे कर्मचारी उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भोळ यांच्या सहकार्याने अतिक्रमण काढण्यास सुरुवात करत आहेत.
वीट भट्ट्यांच्या या अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे निश्चितपणे प्रदूषणाला आळा बसणार आहे. तसेच पर्यावरण चांगले राहणार आहे. अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ नागरिकांनी दिली आहे. या मोहिमेत उदगीर तहसीलच्या कर्मचाऱ्यांचा सक्रिय सहभाग उल्लेखनीय आहे.

About The Author

error: Content is protected !!