मैत्रीपूर्ण भावनेतून समाजसेवा हेच इनरव्हील क्लबचे उद्दिष्ट…डिसी मुक्ती पानसे
उदगीर (प्रतिनिधी) : जागतिक पातळीवरील महिलांची संघटना इनरव्हील क्लबच्या 313 इंडियाच्या डिस्ट्रिक्ट चेअरमन मुक्ती पानसे यांनी उदगीर इनरव्हील क्लबला भेट दिली. या वेळी उदयगिरी मल्टिस्पेशालिटी हाॅस्पिटल येथील सभागृहात स्वागत समारंभ व मिटींग आयोजित करण्यात आली होती.यामध्ये उदगीर इनरव्हील तर्फे डिसी मुक्ती पानसे यांच्या हस्ते तीन महत्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आले.
यात शकुंतला ताई या गरजू महिलेला शिलाई मशीनीचे वाटप, याच बरोबर पल्लवी सुर्यवंशी व मयुरी चौधरी या दोन होतकरू विद्यार्थ्यांनीनां MS -CIT ची प्रवेश शुल्क देण्यात आली. याच्या प्रोजेक्ट प्रमुख इनरव्हील क्लब उदगीरच्या अध्यक्षा सौ. मीरा चंबुले होत्या. तिसरा उपक्रम हा डिसी मुक्ती पानसे यांच्या संकल्पनेतून साकारलेला इनरव्हील गार्डन .
उदगीर येथील विद्यानिकेतन काॅलनी येथे काॅलनीतील रहिवासींच्या सहकार्याने सुंदर इनरव्हील गार्डन तयार करण्यात आले आहे, त्याचे उद्घाटन डिसी मुक्ती पानसे यांच्या हस्ते करण्यात आले.
याच सोहळ्यात इनरव्हील क्लब तर्फे घेण्यात आलेल्या संगीत स्वरताज या गीत गायन स्पर्धेत उदगीर इनरव्हीलच्या वतीने उन्नती आनंद हुरदुळे पोस्ते पोदार स्कूल हिने तृतीय क्रमांक पटकावला. तिला सन्मानित करण्यात आले. लातूर येथे झालेल्या झोनल मिट सताक्षी या इव्हेंट मध्ये लोकनृत्य स्पर्धेत उदगीर इनरव्हीलच्या स्वाती गुरुडे उपाध्यक्ष, मानसी चन्नावार कोषाध्यक्ष, पल्लवी मुक्कावार एडिटर ,नेहा जैन सदस्य,प्रिया नरखेडे सदस्य यांनी सादर केलेल्या ओडिसी संबलपुरी या नृत्यास प्रथम क्रमांक मिळाल्या बद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
आॅगस्ट महिन्यात वाढदिवस असणार्या सदस्यांचा डिसी पानसे यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात आला.या वेळी वारली पेंटिंग असलेली ब्रेडिंगची कापडी पर्स वाढदिवसाची भेट म्हणून देण्यात आली.
या कार्यक्रमासाठी मंचावर डिसी मुक्ती पानसे यांच्या सोबत इनरव्हील क्लब उदगीरच्या अध्यक्षा सौ मीरा चंबुले, सचिव सौ शिल्पा बंडे यांची उपस्थिती होती. या वेळी इनरव्हील क्लबच्या कामकाजाविषयी सविस्तर माहिती आपल्या मार्गदर्शनात डिसी पानसे यांनी दिली. मैत्रीपूर्ण भावनेतून एकमेकांच्या साथीने समाजासाठी जे जे योग्य ,उपयुक्त असेल ते ते करणे हेच इनरव्हील क्लबचे उद्दिष्ट आहे. असे मत त्यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण होते बहारदार आणि भावपूर्ण आवाजात गायलेले डिसी मुक्ती पानसे यांचे ऐ मेरे वतन के लोगो या अजरामर गीताचे मराठी रूपांतर ( हे रुपांतर मुक्ती पानसे यांच्या आईने केलेले आहे) जे व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्यात आले. सोशल मीडियावर हे अतिशय लोकप्रिय होत आहे. कार्यक्रमासाठी इनरव्हील क्लब उदगीरचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
