आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकावणार – आ. बाबासाहेब पाटील
अहमदपूर (गोविंद काळे) : लातूर जिल्ह्यातील आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, नगर पंचायत व महानगरपालिका या निवडणुकांसाठी सनियंत्रण करण्याचे काम प्रभावीपणे होण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस लातूर जिल्हा समन्वय समितीच्या मुख्य समन्वयक पदी आ. बाबासाहेब पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. त्यावेळी बोलताना आ. पाटील यांनी, लातूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकावणार असल्याचे सांगीतले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकला चलो रे ची भूमिका घेणार कि समविचारी पक्षाशी आघाडी करुन लातूर जिल्ह्यातील निवडणुका लढविणार याविषयी बोलताना आ. पाटील यांनी सांगीतले कि, लातूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जिल्हा समन्वय समितीचे सदस्य माजी मंत्री आ. संजय बनसोडे, मकरंद सावे, अफसर शेख, प्रशांत पाटील, बस्वराज पाटील नागराळकर, आशाताई भिसे, अख्तर मिस्त्री, संजय शेटे, राजा मनियार, अॅड . व्यंकट बेद्रे, नवनाथ आल्टे, सुरज चव्हाण असे एकुण १३ नेत्यांची समिती असून समितीतील सदस्यां सोबत चर्चा करून कोणाशी आघाडी करायची की नाही ते ठरणार असल्याने, आत्ताच आघाडी होईल किंवा नाही हे सांगाता येणार नाही असे आ. पाटील यांनी सांगीतले. तसेच पक्षाने दिलेल्या संधीचे सोने करण्यासाठी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांशी चर्चा करुन निर्णय घेणार असल्याचेही आ. पाटील यांनी सांगीतले. लातूर जिल्ह्यात होणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सर्वाधिक जागा मिळण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार असल्याचेही ते म्हणाले.
