शाश्वत विकासासाठी वृक्षारोपण काळाची गरज – आ.संजय बनसोडे
उदगीर (प्रतिनिधी) : पर्यावरण संरक्षण करण्याच्या दृष्टीने समाजातील प्रत्येक घटकाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठीच वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन अत्यंत महत्त्वाचे आहे. केवळ आजचाच विचार करून चालत नाही तर येणारा भविष्यकाळ विचारात घेऊन शाश्वत विकास करणे काळाची गरज आहे. त्यासाठी वृक्षारोपण अत्यंत महत्त्वाचे आहे,असे उद्गार उदगीरचे आमदार संजय बनसोडे यांनी व्यक्त केले. ते बामणी ग्रामपंचायतच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पाच हजार वृक्ष लागवड उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
याप्रसंगी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी , उदगीर उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, तहसीलदार रामेश्वर गोरे, गटविकास अधिकारी महेश सुळे, सहयोग बँकेचे चेअरमन रमेश अंबरखाने,जिल्हा आरोग्यअधिकारी वडगावे, सहकार महर्षी तथा समाजाचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत अण्णा वैजापूरे, ,शिवाजी मुळे, अश्विनीताई आपेट, विद्या आवधुतराव,नितीन वागमारे, प्राचार्य विनायाक जाधव, नगर परिषदेचे मुख्याधिकारी शुभम क्यातमवार,सरपंच प्रभावती बिरादार,बालाजी मुदाले, चेअरमण श्रीमती मुडाले, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात रामेश्वर केसाले,सुभाष वाटपळवर, रुपेश मुंडे,संजीव गुरमे,तलाठी ए. व्हि. डोइजोडे यांचा सत्कार करण्यात आला.
पुढे बोलताना आमदार संजय बनसोडे म्हणाले की, निरोगी समाज राहण्यासाठी जास्तीत जास्त वृक्ष लागवड होणे गरजेचे आहे कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या काळात ऑक्सिजनचे महत्त्व प्रत्येकाला पटलेले आहे वृक्ष मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन देतात, त्यामुळे वृक्ष लागवड करावी. आणि त्याचे संवर्धनही करावे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल टिकून राहील, पर्यावरणाचा समतोल राहिल्यास पर्जन्यमानेही योग्य प्रमाणात होऊ शकेल असेही त्यांनी सांगितले, व बामणी गावाच्या विकासासाठी दिलेल्या विकास निधीची माहिती ही सांगितली. तसेच भविष्यातही कोणत्याही सकारात्मक कार्यासाठी निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन दिले.
या कार्यक्रमाचे उद्घाटक जिल्हाधिकारी पृथ्वीराज बीपी यांनी प्रत्येक ग्रामपंचायतीला बिहार पॅटर्न राबवण्यावर भर देणार असल्याचे सांगून मीयावाकी पद्धतीचे वृक्षारोपण करून लवकरात लवकर वाढणारी झाडे लावण्यासाठी वेगवेगळ्या समाजसेवी संस्था यांचा पुढाकार घेऊन उपक्रम यशस्वी करावेत प्रत्येक गणेश मंडळांनी गणेश उत्सव साजरा करताना किमान शंभर झाडे लावले पाहिजे तरच त्या गणेश मंडळाला ना हरकत प्रमाणपत्र दिले जाईल केवळ वृक्षारोपण करून न थांबता वृक्ष संवर्धनाची जबाबदारी त्यांनी घ्यावी या वृक्षाचे संगोपन करून पुढील वर्षी नोंदणी नूतनीकरण करताना या वृक्षाचे फोटो सोबत जोडावेत असेही आवाहन त्यांनी केले या वृक्षाचे संगोपन केल्यास जिल्हा नियोजन मंडळातून प्रत्येक ग्रामपंचायत साठी विशेष निधी उपलब्ध करून दिला जाईल असेही आश्वासन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बीपी यांनी दिले. मराठवाडा दुष्काळग्रस्त होण्यामागे वनीकरणाचे क्षेत्र अत्यंत कमी असल्याने पावसाचे प्रमाण अनियमित आहे त्यामुळे वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणात केली जावी जेणेकरून पावसाळा नियमित राहील आणि दुष्काळाची परिस्थिती निर्माण होणार नाही याचे भान सर्वांनी ठेवावे असेही आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले
सहयोग अर्बन बँकेचे चेअरमन रमेश अंबरखाने यांनी आपल्या भाषणातून ग्रामस्थांचे या वृक्षारोपण उपक्रमासाठी दिलेले योगदान अत्यंत महत्त्वाचे असून असाच आदर्श जिल्ह्यातील इतर सर्व ग्रामपंचायत यांनी घेतल्यास निश्चितपणे जिल्ह्याचे वनक्षेत्र वाढेल असा विश्वास व्यक्त केला. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल केंद्रे उद्योगपती सागर महाजन प्राध्यापक सुरेश शिंदे धन्वंतरी आयुर्वेदिक महाविद्यालयातील प्राध्यापक शितल जाधव इत्यादींची भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ नागरिक राजकुमार बिरादार यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमर स्वामी यांनी तर आभार प्रदर्शन खंकरे यानी केले.
या वृक्षारोपण मोहिमेसाठी उदगीर येथील धन्वंतरी आयुर्वेदिक महाविद्यालय, जय हिंद पब्लिक स्कूल व महाविद्यालय, उदगीर तालुका पत्रकार संघ, शिवाजी महाविद्यालयाच्या एनएसएस विभाग, रोटी कपडा बँक, कर्मा फाउंडेशन, नागप्पा अंबरखाने ब्लड बँक, मिशन उदगीर ग्रीन, रोटरी क्लब, कृषी महाविद्यालय उदगीर चे गंगाधरराव दापकेकर इत्यादींचा मोठा सहभाग होता.
