स्वामी विवेकानंद महाविद्यालयात बीएसएफच्या वतीने शस्त्र प्रदर्शन

स्वामी विवेकानंद महाविद्यालयात बीएसएफच्या वतीने शस्त्र प्रदर्शन

शिरूर ताजबंद (गोविंद काळे) : येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयातील सांस्कृतिक विभाग, राष्ट्रीय सेवा योजना विभाग तसेच चाकूर येथील बीएसएफ प्रशिक्षण केंद्राच्या संयुक्त विद्यमाने शस्त्र प्रदर्शन तथा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव उपक्रमाच्या अंतर्गत हे शिबिर घेण्यात आले. यावेळी बीएसएफ प्रशिक्षण केंद्राचे द्वितीय कमान अधिकारी कपिल चौहान, आरोग्य चिकित्सा अधिकारी डॉ. विठ्ठल कावडे, सहाय्यक कमान अधिकारी उत्तम कांबळे, निरीक्षक गजानन महाजन, शांतीलाल वळकुंडे तसेच त्यांच्या प्रशिक्षण केंद्रातील विविध अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी उत्तम कांबळे यांनी विद्यार्थ्यांना बीएसएफचा इतिहास सांगून भरती प्रक्रियेतील विविध महत्त्वाच्या नोंदी सांगितल्या. मुलींसाठी बीएसएफ मध्ये असलेल्या विविध संधी आणि त्याची भरती याबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी महाविद्यालयाच्या प्रांगणावर बीएसएफच्या वतीने विविध शस्त्रांचे प्रदर्शन ठेवण्यात आले होते. शिरूर ताजबंद मधील शाळेतील विद्यार्थी तथा नागरिकांनी शस्त्रांची माहिती घेतली. शस्त्रे हातात घेऊन विद्यार्थ्यांनी आनंद लुटला. देशाच्या सीमेवर सतत सुरक्षा देणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना जवळून पाहण्याची इच्छा यानिमित्ताने पूर्ण झाल्याचे समाधान प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होते. यावेळी शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. माने होते. तर उपप्राचार्य व्यंकट कीर्तने, बी. एड. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एस. पाटील, डी. एड. विद्यालयाचे प्राचार्य यादव कर्डिले, क्रीडा संचालक डॉ. भास्कर माने मंचावर उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. गोविंद काळे यांनी तर आभार डॉ. भास्कर माने यांनी व्यक्त केले. यावेळी औरंगाबाद येथील एम. सी. एन. न्युजचे वार्ताहर धर्मपाल सरवदे आणि त्याचे सहकारी, महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author