यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नांदेड विभागाच्या वतीने युवक महोत्सवाचे आयोजन

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नांदेड विभागाच्या वतीने युवक महोत्सवाचे आयोजन

अहमदपूर (गोविंद काळे) : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी विभागीय युवक महोत्सवाचे आयोजन दि. २४ सप्टेंबर २०२२ रोजी नांदेड येथील विभागीय केंद्रात करण्यात आले आहे. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव डॉ. चंद्रकांत पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार या युवक महोत्सवात नांदेड, लातूर, हिंगोली व परभणी या चार जिल्ह्यांमधील अभ्यास केंद्रावरील प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी या युवक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांचा आविष्कार व्हावा हा मूळ उद्देश समोर ठेवून २५ वर्ष वयापेक्षा कमी असलेल्या विद्यार्थ्यांना या युवक महोत्सवात सहभागी होता येईल. युवक महोत्सवांमध्ये शास्त्रीय गायन प्रकारात भारतीय व कर्नाटकी शास्त्रीय वाद्य संगीत तालवाद्य व स्वरवाद्य, पाश्चिमात्य प्रकारात समूहगान, लोकसंगीत, तर नृत्य प्रकारात लोककला, आदिवासी नृत्य, शास्त्रीय नृत्य, तसेच वांग्मयीन कला प्रकारात प्रश्नमंजुषा, वक्तृत्वकला, व वादविवाद स्पर्धा आणि रंगमंचीय कला प्रकारात एकांकिका, प्रहसन, मूकनाट्य, नकला व ललित कला प्रकारात स्थळचित्र, पोस्टर मेकिंग, चिकट कला , रांगोळी , स्थळ छायाचित्रण, मातीकला, व्यंगचित्रे आदी कला प्रकारामध्ये विद्यार्थ्यांना सहभागी होता येईल.

या युवक महोत्सवात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणात पत्र देण्यात येणार आहे. तसेच, निवड झालेल्या विद्यार्थ्यांसाठी नाशिक येथे होणाऱ्या केंद्रीय युवक महोत्सवामध्ये आपली कला सादर करता येणार आहे. यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी युवक महोत्सवात सहभागी व्हावे. असे, आवाहन नांदेड विभागीय केंद्राचे सहाय्यक कुलसचिव डॉ. चंद्रकांत पवार यांनी केले आहे.

About The Author