आरोपीने दिल्या पोलिसांच्या हातावर तुरी !! तीन पोलीस गेले घरी !!!
उदगीर तालुक्यातील करडखेल येथे गेल्या काही दिवसापूर्वी काही लोकांनी मिळून एकास बेदम मारहाण केल्याप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे रीतसर गुन्हा नोंद करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपींना अटक करावी म्हणून जनरेटाही वाढला होता. या गोष्टीची गांभीर्याने नोंद घेत उपविभागीय पोलीस अधिकारी डॅनियल जॉन बेन यांनी व्यक्तिगत लक्ष घालून ग्रामीण पोलिसांना मार्गदर्शन केले होते.
ग्रामीण पोलीस स्टेशनचे जेष्ठ पोलीस निरीक्षक दीपककुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलीस स्टेशनच्या विशेष पथकाने यातील एका आरोपीस पकडले ही होते. मात्र या आरोपीला उदगीर येथील न्यायालयाने आरोपीस न्यायालयीन कोठडी मंजूर केली होती.
त्यामुळे आरोपीस लातूर येथील मध्यवर्ती कारागृहात घेऊन जात असताना, करडखेल पाटी जवळ आरोपीने बस थांबल्याचा गैरफायदा घेत प्रवासी चढत, उतरत असताना पोलिसांच्या हाताला हिसका देऊन पोलिसांच्या ताब्यातून आपली सुटका करून घेत फरार झाला. याप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याचे दोन पोलीस हवालदार व एक पोलीस नाईक अशा तिघांना निलंबित करण्यात आल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॅनियल जॉन बेन यांनी दिली आहे.
याप्रकरणी पोलीस सूत्राकडून हाती आलेली माहिती अशी की, करडखेल पाटी येथील हाणामारीच्या प्रकरणात गून्हा रजिस्टर नंबर ३७९/२२ कलम 307, 329 यासह इतर कलमान्वये केलेल्या गुन्ह्या प्रकरणी भारतीय दंड विधान संहिता अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.
या गुन्ह्यातील आरोपी लखन ईश्वर कसबे (रा. करडखेल, तालुका उदगीर) याची गुरुवारी उदगीर येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांनी न्यायालयीन कुठली मंजूर केली होती. या आरोपीस पोलीस हवालदार राजाराम नकुलवाड आणि पोलीस नाईक गोविंद लटपटे हे उदगीर येथून बसमध्ये मध्यवर्ती कारागृह लातूर येथे घेऊन जात होते. दुपारी चार वाजून 35 मिनिटांच्या सुमारास करडखेल पाटीच्या पुढे काही अंतरावर बस थांबली असता, गर्दीचा फायदा घेऊन आरोपीने पोलिसाच्या हाताला झटका देऊन पलायन केले.
पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झालेला आरोपी लखन कसबे याच्याविरुद्ध पोलीस हवालदार राजाराम नकुलवाड यांनी दिलेल्या तक्रारीवरून उदगीर ग्रामीण पोलिसात पुन्हा गुन्हा रजिस्टर नंबर 397/ 22 कलम 224 भारतीय दंड विधान संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन दिवसापासून पोलिसांची अनेक पथके आरोपीचा शोध घेत आहेत. दरम्यान पोलिसांच्या कायदेशीर प्रक्रियेतून हाती आलेली खात्रीशीर माहिती अशी की, पोलिसांच्या हातावर तुरी दिलेल्या आरोपीमुळे पोलीस हवालदार राजाराम नकुलवाड, विजय हुगेवाड आणि गोविंद लटपटे या तिघांना निलंबित करण्यात आले असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॅनीयल जॉन बेन यांनी दिली आहे.
हाणामारीच्या प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या हातातून पळून गेल्याने या प्रकरणाची चर्चा चांगलीच रंगली आहे. तसेच ग्रामीण पोलिसांच्या तपास पथकाला या आरोपीने आव्हान दिले आहे. या आरोपीच्या मागावर पोलीस लागले असल्याची माहिती ज्येष्ठ पोलीस निरीक्षक दीपककुमार वाघमारे यांनी दिली आहे.